हार्दिक पंडय़ा बारावा गडी, इंग्लंडच्या 4, पाकच्या 2, न्यूझीलंड, झिम्बावे, द.आफ्रिकेच्या एका खेळाडूचा समावेश
वृत्तसंस्था/ मेलबर्न
टी-20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा जमविणारा विराट कोहली व धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव या दोन भारतीय खेळाडूंची आयसीसी टी-20 विश्वचषक संघात निवड करण्यात आली आहे तर हार्दिक पंडय़ाला या संघात बारावा गडी म्हणून स्थान मिळाले आहे.
भारतीय सुपरस्टार कोहली हा या स्पर्धेतील सर्वाधिक धावा जमविणारा फलंदाज आहे. त्याने 98.66 धावांच्या सरासरीने एकूण 296 धावा जमविल्या. सुपर 12 फेरीतील पहिल्याच सामन्यात त्याने पाकविरुद्ध नाबाद 82 धावांची संस्मरणीय खेळी करीत भारताला रोमांचक विजय मिळवून दिला. त्यानंतर त्याने बांगलादेशविरुद्ध नाबाद 64, नेदरलँड्सविरुद्ध नाबाद 62 आणि उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध 50 धावांची खेळी करीत व्हाईटबॉल क्रिकेटमधील एक महान खेळाडू असल्याचे दाखवून दिले. त्याचाच सहकारी सूर्यकुमार यादव या स्पर्धेत सर्वाधिक धावा जमविणारा दुसऱया क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याने 239 धावा जमविताना तीन धडाकेबाज अर्धशतके नोंदवली. नेदरलँड्सविरुद्ध नाबाद 51, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 68 व झिम्बाब्वेविरुद्ध केवळ 25 चेंडूत नाबाद 61 धावांच्या खेळीमुळे भारताला उपांत्य फेरी गाठण्यात उपयोगी ठरली. सहा डावात 189.68 अशा जबरदस्त स्ट्राईकरेटने त्याने हा धावा फटकावल्या. हार्दिक पंडय़ाची कामगिरीही बऱयापैकी झाली, मात्र त्याला बाराव्या गडय़ाच्या रूपात आयसीसी संघात स्थान मिळाले.
‘सहा विविध संघांतील खेळाडूंची अपस्टॉक्स मोस्ट व्हॅल्युएबल टीम ऑफ आयसीसी टी-20 वर्ल्ड कप संघात निवड करण्यात आली आहे,’ असे आयसीसीने निवेदनात सांगितले. कर्णधार, यष्टिरक्षक व सलामीवीर जोश बटलर, त्याचा सहकारी सलामीवीर ऍलेक्स हेल्स, सीमर सॅम करन व मार्क वुड या इंग्लंडच्या चार खेळाडूंना या संघात स्थान मिळाले आहे. न्यूझीलंडचा स्टार ग्लेन फिलिप्स, झिम्बाब्वेचा अष्टपैलू सिकंदर रझा यांना या संघातील पाचव्या व सहाव्या क्रमांकासाठी निवडण्यात आले. लंकेविरुद्ध फिलिप्सने नोंदवलेल्या सनसनाटी शतकाच्या बळावर न्यूझीलंडला 65 धावांनी सहज विजय मिळविता आला. इंग्लंडविरुद्धही त्याने 62 धावांची खेळी केल्याने 40.20 च्या सरासरीने त्याच्या या स्पर्धेत एकूण 201 धावा झाल्या. रझाने 219 धावा व दहा बळी मिळवित झिम्बाब्वेसाठी मोलाची कामगिरी बजावली. आयर्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात त्याने 48 चेंडूत 82 धावा फटकावल्या. त्यानंतर त्याने स्कॉटलंड, नेदरलँड्स व भारताविरुद्धही उपयुक्त योगदान दिले. 25 धावांत 3 बळी मिळवित त्याने पाकला पराभवाचा धक्का देण्यात महत्त्वाचे योगदान देत स्पर्धा संस्मरणीय केली.
पाकचा अष्टपैलू शदाब खानच्या समावेशाने या संघाची मध्यफळी पूर्ण होते. त्याने 15 धावांच्या सरासरीने या स्पर्धेत 11 बळी टिपले. त्याने फलंदाजीतही प्रभावी कामगिरी करताना 24.50 च्या सरासरीने 98 धावा जमविल्या. सॅम करन व द.आफ्रिकेचा ऍन्रिच नॉर्त्जे हे वेगवान गोलंदाज आठव्या व नवव्या क्रमांकासाठी असतील. करनने अंतिम सामन्यात 12 धावांत 3 बळी टिपण्याची अप्रतिम कामगिरी करीत सामनावीर व स्पर्धावीर असे दोन्ही पुरस्कार पटकावले. त्याआधी त्याने अफगाणविरुद्धही शानदार प्रदर्शन करीत 10 धावांत 5 बळी मिळविले होते. नॉर्त्जे हा चमक दाखविलेला आणखी एक स्टार गोलंदाज आहे. द.आफ्रिका संघातील तो प्रमुख अस्त्र असून 8.54 या सर्वोत्तम सरासरीसह त्याने बळी मिळविले. त्याने 11 बळी मिळविताना फक्त 94 धावा दिल्या. बांगलादेश व पाकिस्तानविरुद्ध त्याने प्रत्येकी चार बळी मिळवित आपली भेदकता दाखवून दिली. दहाव्या व अकराव्या क्रमांकासाठी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड (9 बळी) व पाकचा शाहीन शाह आफ्रिदी (11 बळी) यांची निवड झाली आहे.
उपांत्य व अंतिम फेरीत अनफिट असल्याने खेळू शकला नसला तरी मार्क वुडने सुपर 12 फेरीतील सातत्यपूर्ण प्रदर्शन केले. अफगाण व आयर्लंडविरुद्ध त्याने प्रत्येकी 3 बळी मिळविले. 12 ही त्याची सरासरी होती. अंतिम फेरीत दुर्दैवाने दुखापत झालेल्या शाहीन आफ्रिदीने बांगलादेशविरुद्ध 22 धावांत 4, द.आफ्रिकेविरुद्ध 14 धावांत 3 बळी मिळवित मागील वर्षीच्या कामगिरीची पुनरावृत्ती केली. पण अंतिम फेरीत तो दोनच षटके गोलंदाजी करू शकला, ज्याचा बराच फटका पाकिस्तानला बसला आणि थोडक्यात जेतेपद गमवावे लागले. बारावा गडी हार्दिक पंडय़ा हा मध्यफळीतील धोकादायक फलंदाज असून इंग्लंडविरुद्ध 63 धावा झोडपल्या. याशिवाया त्याने पाकिस्तान, बांगलादेश, झिम्बाब्वेविरुद्ध महत्त्वाचे बळीही मिळविले.
निवडण्यात आलेला आयसीसी टी-20 वर्ल्ड कप संघ (फलंदाजीच्या क्रमानुसार) ः ऍलेक्स हेल्स (212 धावा), जोस बटलर (225), विराट कोहली (296), सूर्यकुमार यादव (239), ग्लेन फिलिप्स (201), सिकंदर रझा (219 धावा, 10 बळी), शदाब खान (98 धावा व 11 बळी), सॅम करन (13 बळी), ऍन्रिच नॉर्त्जे (11 बळी), मार्क वुड (9 बळी), शाहीन आफ्रिदी (11 बळी). 12 वा गडी ः हार्दिक पंडय़ा (128 धावा व 8 बळी).