वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आजपासून आशियाई सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेला सुरुवात होत असून पुरुष गटात भारताने तगडा संघ उतरवला आहे. महिला गटात मात्र सायना नेहवाल व पीव्ही सिंधूच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंवर मदार असणार आहे. येथील इनडोअर स्टेडियमवर हे सामने खेळवले जातील.
भारताची अव्वल खेळाडू पीव्ही सिंधू व सायना नेहवाल यांनी ऑलिम्पिक पात्रतेवर फोकस करण्यासाठी या स्पर्धेतून माघार घेतली आहे. या दोन्ही खेळाडू पुढील आठवडय़ापासून फिलिपीन्स येथे होणाऱया सुदीरमन चषक स्पर्धेत सहभागी होतील. यामुळे सायना, सिंधूच्या अनुपस्थितीत मालविका बनसोड व अश्मिता चालिहा या युवा खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. याशिवाय, गायत्री गोपीचंद, आकर्षी कश्यप, ऋतुपर्ण पांडा या राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱया खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे.
पुरुष गटात मात्र यंदा भारताने तगडा संघ उतरवला असून अव्वल खेळाडू किदाम्बी श्रीकांत व साई प्रणित यांच्यावर भारतीय संघाची मदार असेल. तसेच एचएस प्रणॉय, लक्ष्य सेन, शुभकंर डे हे खेळाडू सहभागी होतील. पुरुष दुहेरीत सात्विकराज-चिराग शेट्टी तसेच ध्रुव कपिला-एमआर अर्जुन यांच्यावर भारताच्या अपेक्षा असणार आहेत.
भारतीय पुरुष संघ – बीसाई प्रणित, किदाम्बी श्रीकांत, प्रणॉय, शुभकंर डे, लक्ष्य सेन, सात्विकराज, चिराग शेट्टी, ध्रुव कपिला व एमआर अर्जुन.
भारतीय महिला संघ – अश्मिता चालिहा, आकर्शी कश्यप, मालविका बनसोड, गायत्री गोपीचंद, अश्विनी भाट, शिखा गौतम, ऋतुपर्ण पांडा व के.मनीषा.