उर्वरित तिघे इंग्लिशमन खेळाडू येत्या 48 तासात रवाना होणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आयपीएल स्पर्धा अनिश्चित कालावधीकरिता स्थगित केली गेल्यानंतर या स्पर्धेत सहभागी विदेशी खेळाडूंचा मायदेशी परतण्याचा मार्ग खुला झाला आहे. मंगळवारी 8 इंग्लिश खेळाडू मायदेशी सुरक्षितपणे दाखल झाले तर ऑस्ट्रेलियन खेळाडू मालदीवमार्गे ऑस्ट्रेलिया गाठण्याच्या प्रयत्नात आहेत.
जोस बटलर, जॉनी बेयरस्टो, सॅम करण, टॉम करण, सॅम बिलिंग्ज, ख्रिस वोक्स, मोईन अली, व जेसॉन रॉय हे मंगळवारी लंडनमध्ये दाखल झाले. ते आता आपल्या निवासस्थानी रवाना होण्यापूर्वी 10 दिवस केंद्रीय मान्यता असलेल्या हॉटेलमध्ये क्वारन्टाईन असणार आहेत. इंग्लिश कर्णधार इयॉन मॉर्गन, डेव्हिड मलान व ख्रिस जॉर्डन हे देखील येत्या 48 तासात इंग्लंडला रवाना होतील, असे सध्याचे संकेत आहेत.
‘आयपीएल स्पर्धेत सहभागी झालेले 11 पैकी 8 इंग्लिश क्रिकेटपटू हिथ्रो विमानतळावर आज सकाळी दाखल झाले आहेत. उर्वरित 3 खेळाडू लवकरच मायदेशी परततील’, असा दुजोरा इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने वृत्तसंस्थेशी बोलताना दिला.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन खेळाडू मात्र अद्याप मायदेशाकडील प्रवास कशा स्वरुपाचा असेल, या विवंचनेत आहेत. सध्या प्राप्त माहितीनुसार, हे खेळाडू प्रथम मालदीवला पोहोचतील आणि तिथे काही काळ थांबून त्यानंतर मायदेशी रवाना होतील, असे संकेत आहेत. तूर्तास, ऑस्ट्रेलियाने भारतातील कोरोनाचा उद्रेक लक्षात घेता भारतातून ऑस्ट्रेलियात येणाऱया प्रवाशांवर बंदी लादली आहे. त्यामुळे, या ऑस्ट्रेलियन खेळाडूंची अडचण झाली आहे. याशिवाय, क्रिकेट ऑस्ट्रेलिया तसेच ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी देखील यापूर्वी या खेळाडूंसाठी चार्टर फ्लाईट उपलब्ध करुन देण्यास असमर्थता दर्शवली आहे. सध्या सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडू दिल्लीत आहेत.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष निक हॉकली यांनी याबाबत बोलताना बीसीसीआय आपल्याशी पूर्ण संपर्कात असून सर्व खेळाडूंना मायदेशी सुरक्षित पोहोचवण्याची त्यांनी ग्वाही दिली असल्याचे नमूद केले. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचे 11, न्यूझीलंडचे 10, विंडीजचे 9, अफगाणिस्तानचे 3 तर बांगलादेशचे 2 खेळाडू सहभागी होते. यातील न्यूझीलंडच्या खेळाडूंचा एक गट प्रथम इंग्लंडमध्ये पोहोचेल आणि त्यानंतर मायदेशी रवाना होईल, असे न्यूझीलंड क्रिकेटपटू संघटनेचे अध्यक्ष हिथ मिल्स यांनी नमूद केले. या खेळाडूंना 11 मे पर्यंत तरी मायदेशी पोहोचता येणार नाही, असे संकेत यावेळी वरिष्ठ स्तरावरुन देण्यात आले आहेत.
एकापेक्षा एक स्टार खेळाडूंचा समावेश असलेली यंदाची आयपीएल स्पर्धा केकेआरचे वरुण चक्रवर्ती, संदीप वॉरियर, सनरायजर्स हैदराबादचा वृद्धिमान साहा, दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा असे 4 खेळाडू पॉझिटिव्ह ठरल्यानंतर अनिश्चित कालावधीकरिता स्थगित केली गेली. चेन्नई सुपरकिंग्सचे गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी व फलंदाजी प्रशिक्षक माईक हसी हे देखील कोरोनाबाधित असल्याचे यावेळी स्पष्ट झाले आहे. 60 सामन्यांचा समावेश असणारी यंदाची आयपीएल स्पर्धा 52 दिवस चालणार होती. पण, केवळ 24 दिवसांचेच क्रिकेट होऊ शकले आहे. भारतात आताही रोज 3 लाख नवे रुग्ण आढळून येत आहेत आणि 3 हजार व्यक्तींचा बळी जात आहे.
भारतातून प्रवासावर बंदी असल्याने ऑस्ट्रेलियन खेळाडूंची अडचण
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत सहभागी झालेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंसमोर सध्या मालदीवमार्गे ऑस्ट्रेलियाला पोहोचणे हा एकच पर्याय बाकी आहे. भारतात कोरोनाचा उद्रेक होत राहिला असल्याने ऑस्ट्रेलियन प्रशासनाने भारतातून येणाऱया प्रवाशांवर बंदी लादली आहे. त्यामुळे, त्यांना हा पर्याय निवडणे भाग असणार आहे.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत 38 ऑस्ट्रेलियन सदस्यांचे पथक विविध भूमिकेत कार्यरत होते. यात खेळाडू, प्रशिक्षक, पंच व समालोचकांचा समावेश होता. या सर्वांना ऑस्ट्रेलियाच्या आंतरराष्ट्रीय सीमा खुल्या होईतोवर प्रतीक्षा करावी लागणार आहे. चेन्नई सुपरकिंग्सचे फलंदाजी प्रशिक्षक माईक हसी यांना कोरोनाची बाधा झाली असल्याने अगदी मालदीवपर्यंतही प्रवास करता येणार नाही. येथे 10 दिवसांचे क्वारन्टाईन पूर्ण झाल्यानंतर निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतरच ते रवाना होऊ शकणार आहेत.