भव्यतेत भर घालणार आकर्षक कलाप्रदर्शने : खुल्या जागेत चित्रपट प्रदर्शन आणि बरेच काही
प्रतिनिधी /पणजी
येत्या रविवार दि. 20 पासून होणाऱया इफ्फी अर्थात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी गोवा सजत असून या महोत्सवात सहभागी होणाऱया प्रतिनिधींच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे.
आदरातिथ्यासाठी जगप्रसिद्ध असलेल्या गोव्याला इफ्फीचे कायमस्वरुपी केंद्र म्हणून मान्यता मिळाल्यापासून राज्याने महोत्सवाचे आणि सहभागी प्रतिनिधींचे खुल्या दिलाने स्वागत केले आहे.
गोव्यात 2004 पासून इफ्फी
सदोदित उत्साही आणि आदरातिथ्यशील नागरिक अशी जगभरात ओळख असलेल्या गोव्यात 2004 पासून या महोत्सवाच्या आयोजनास प्रारंभ झाला. तेव्हापासून प्रत्येक वर्षी येथील लोकांनी प्रतिनिधींचे आपल्या वैशिष्टय़पूर्ण शैलीत भव्य स्वागत केले आहे. या आदरातिथ्यामुळेच प्रतिनिधींना प्रत्येक वर्षी येथे येण्याचा मोह होतो.
प्रतिनिधींच्या स्वागतासाठी रोमांचकारी कार्यक्रम आणि एकापेक्षा एक आकर्षणे असतात. राजधानीतील कला अकादमीपासून गोवा करमणूक सोसायटी परिसरापर्यंतचा महोत्सव मार्ग तसेच फूटपाथ आकर्षक कलाकृतींनी सजविण्यात येतात. या वातावरणात रसिक भारावून मंत्रमुग्ध होत असतात. त्याशिवाय महोत्सवाच्या मार्गात खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल्स् पर्यटक तसेच प्रतिनिधींना आकर्षित करतात. येथील स्वदिष्ट अन्नावर ताव मारून त्यांचा आस्वाद घेण्याची संधी सर्वांना असेल. या खाद्यपदार्थांची चव चाखून या सर्वांचा महोत्सवात वावरण्याचा उत्साह आणखी द्विगुणीत होईल.
ओपन एअर स्क्रीनिंग
जे पर्यटक आणि स्थानिक रहिवाशांनी महोत्सवासाठी प्रतिनिधी म्हणून नोंदणी केलेली नाही त्यांच्यासाठी इफ्फीने वेगळा मार्ग चोखंदळला आहे. प्रतिनिधींना आनंद देणाऱया आणि मंत्रमुग्ध करणाऱया सामग्रीचे ओपन एअर क्रीनिंग करून सिनेमाचा आस्वाद घेण्याचे आवाहन केले आहे. आल्तीनो येथील जॉगर्स पार्क, मिरामार समुद्रकिनारी आणि मडगाव येथील रवींद्र भवन येथे ओपन एअर स्क्रीनिंगच्या माध्यमातून सर्वोत्तम सिनेमांचा आस्वाद घेता येणार आहे.
मनोरंजन क्षेत्र
या व्यतिरिक्त विविध ठिकाणी मनोरंजनात्मक कार्यक्रमांचेही आयोजन होणार आहे. पणजीतील भगवान महावीर चिल्ड्रन्स पार्क, आर्ट पार्क येथे करमणूक विभाग स्थापन करण्यात येतील. दोन्ही ठिकाणी लाइव्ह परफॉर्मन्स, आकर्षक कलाकृती आणि अर्थातच फूड स्टॉल्स असतील. या क्षेत्रात महोत्सव काळात सर्वांना प्रवेश मोफत असेल.