शिक्षण क्षेत्रात कितीही सुधारणा झाल्या, किंवा ते क्षेत्र कितीही मागास ठेवलं तरी शाळा भरताना जड पावलांनी जाणारी मुलं शाळा सुटल्यावर दुडूदुडू धावत सुटणार. त्यात फरक नाही. शाळा सुटल्याचा जो काय आनंद आहे, तो मुलांनाच ठाऊक. पहिली ते चौथीचे माझे दिवस आठवतात. शाळेत गोविंदा नावाचा शिपाई होता. वयाने मोठाच होता पण आम्ही सगळी कच्चीबच्ची त्याला गोविंदाच म्हणायचो. गोविंदा खाकी डगला आणि पांढरी ढगळ तुमान घालून यायचा. शाळेची घंटा अशा ठिकाणी होती की पुढच्या ओळीतल्या मुलांना तिरप्या नजरेने पाहिल्यावर घंटेपाशी आलेला गोविंदा दिसायचा. तिथे येऊन भिंतीवरच्या घडय़ाळाकडे बघत उभा राह्यचा. तो दिसला की छातीत एक गोड हुरहूर सुरू व्हायची. त्याची नजर घडय़ाळाकडे आणि आमच्या नजरा बाईंची नजर चुकवून गोविंदाकडे. बरोब्बर अकरा वाजले की तो खाली बघायचा आणि ठण ठण ठण घंटानाद करायचा. अहाहा… त्या क्षणी काय आनंद व्हायचा तो शब्दात सांगणं अशक्मय आहे.
तूर्तास मुलांच्या ऑनलाइन शाळा चालू आहेत. केव्हातरी साक्षात चालू होतीलच. त्यावेळी आमच्यासारखी मुलं शाळेत काय धमाल करतील. वेगवेगळय़ा तक्रारी सांगून बाईंना भंडावून सोडतील.
“मुलांनो, लक्षात ठेवा. जेवणाच्या सुट्टीत डबा खाताना मास्क फक्त हनुवटीवर सरकवायचा आहे. काढून ठेवायचा नाही. आणि डबा खाल्ल्यावर हात स्वच्छ धुवून पुसून मग तो मास्क पुन्हा नाकातोंडावर सरकवायचा आहे.’’
“बाई, याने माझ्या मास्कला शाई लावली. मी मास्क बदलायला घरी जाऊ?’’
“बाई, मधल्या सुट्टीत माझा मास्क कोणी तरी लपवला.’’
“गण्या, तू मास्कशिवाय का आलास शाळेत?’’
“बाबा चुकून माझा मास्क घालून ऑफिसला गेले. बाबांचा मास्क लावून मी येणार होतो. पण आई बाबांच्या मास्कला हात लावू देत नाही.’’
“मी फळय़ावर लिहीत असताना मास्कच्या आतून कोणी मांजराचा आवाज काढला? चटकन कबूल करा. नाहीतर वर्गातल्या प्रत्येकाचं मास्काड’’ सॉरी, मुस्काट “फोडून काढीन.’’
आणि पुलंच्या ‘असा मी असामी’ मधली सरोज खरे शिक्षिका असेल तर शंकऱयासारखं एखादं वांड पोरगं बाईंना थेट विचारील देखील, “बाई, हा मधू म्हणतो की दिवसभर मास्क लावणे कंपल्सरी असल्यामुळे आपल्या खरे बाईंनी आता लिपस्टिक लावायचं सोडून दिलंय. खरं का हो बाई?’’