प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यातील ईशान्य परिवहन निगमचे ‘कल्याण कर्नाटक परिवहन निगम’ असे फेरनामकरण करण्यात आले आहे. परिवहन निगम अधिनियम 1950 च्या कलम 3 नुसार अधिकाराचा वापर करून राज्य सरकारने फेरनामकरणासंबंधीचा आदेश बुधवारी जारी केला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री व परिवहनमंत्री लक्ष्मण सवदी यांनी दिली.
हैदराबाद-कर्नाटक भागाचे कल्याण कर्नाटक असे नामकरण करण्यात आले होते. त्यानंतर ईशान्य परिवहन निगमचेही कल्याण कर्नाटक परिवहन निगम असे नामकरण करावे, अशी मागणी करण्यात आली होती. बिदर, रायचूर, बळ्ळारी, गुलबर्गा, यादगीर आणि कोप्पळ या सहा जिल्हय़ांतील लोकांच्या भावनांचा विचार करून राज्य सरकारने ईशान्य परिवहनचे नाव बदलले असल्याचे सवदी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.