फायनलच्या दिवशी पहा काय होणार
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले असून हा सामना संस्मरणीय बनवण्यासाठी बीसीसीआयनेही जंगी तयारी केली आहे. फायनलच्या दिवशी कोणते कार्यक्रम होणार आहेत, याची माहिती बीसीसीआयने आज शनिवारी दिली.
सामन्यापूर्वी भारतीय वायुसेनेचा एरोबॅटिक संघ सूर्यकिरण हा एअर शो करेल. नाणेफेक झाल्यानंतर लगेचच दुपारी 1.35 वाजता एअर शो सुरू होईल. एअर शो 15 मिनिटे चालेल आणि दुपारी 1:50 वाजता संपेल. यानंतर दोन्ही संघांचे राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर सामना सुरू होईल.
सामन्यादरम्यान पहिल्या डावात ड्रिंक्स ब्रेक दरम्यान गायक आदित्य गढवी परफॉर्म करणार आहे. यानंतर सामन्याचा पहिला डाव संपल्यानंतर प्रसिद्ध संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांचा कार्यक्रम होणार आहे. त्यांच्याशिवाय प्रसिद्ध गायिका जोनिता गांधी, नकाश अजीज, अमित मिश्रा, आकाश सिंग आणि तुषार जोशी हे देखील परफॉर्म करणार आहेत. यानंतर दुसऱ्या डावातील ड्रिंक्स ब्रेक दरम्यान लेझर आणि लाइट शो आयोजित केला जाईल.
विश्वविजेत्या कर्णधारांना मिळणार खास ब्लेझर
बीसीसीआयने 1975 ते 2019 मधील सर्व विश्वचषक विजेत्या कर्णधारांना एक विशेष ब्लेझर देखील देणार आहे. वेस्ट इंडिजचे दिग्गज क्लाइव्ह लॉईड (1975 आणि 1979), भारताचे कपिल देव (1983), ऑस्ट्रेलियाचे अॅलन बॉर्डर (1987), श्रीलंकेचा अर्जुन रणतुंगा (1996), ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह वॉ (1999), रिकी पॉन्टिंग (2003 आणि 2007), भारताचा महेंद्रसिंग धोनी (2011), ऑस्ट्रेलियाचा मायकल क्लार्क (2015), इंग्लंडचा इऑन मॉर्गन (2019) या सर्वांना आमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान, श्रीलंकेचा 1996 विश्वचषक विजेता कर्णधार अर्जुन रणतुंगा आणि पाकिस्तानचा 1992 विश्वचषक विजेता कर्णधार इम्रान खान यांना आमंत्रित करण्यात आले आहे की नाही हे स्पष्ट झालेले नाही.
साबरमती रिव्हरफ्रंट क्रूझवर दोन्ही संघ एकत्र येणार
क्रिकेट वर्ल्डकपचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी रंगणार आहे. या सामन्याच्या एक दिवसआधी म्हणजेच शनिवारी दोन्ही संघ डिनरसाठी एकत्र येणार आहेत. साबरमती नदीवर बांधण्यात आलेल्या रिव्हर क्रूझमधून दोन्ही संघांना जेवणासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. रिव्हर क्रूझ रेस्टॉरंट अहमदाबादच्या साबरमती नदीवर बांधले आहे. रेस्टॉरंटचे मालक सुहर मोदी यांनी सांगितले की, भारत-ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी आयोजित डिनरमध्ये गुजराती पदार्थांचा समावेश असणार आहे. याशिवाय दोन्ही संघाचे खेळाडू अटल फूट ओव्हर ब्रिजलाही भेट देतील.
वर्ल्डकप फायनलसाठी भारतीय रेल्वेही सज्ज
क्रिकेट वर्ल्डकपचा अंतिम सामना 19 नोव्हेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार आहे. संपूर्ण देश आणि क्रिकेट चाहत्यांच्या नजरा रविवारी (19 नोव्हेंबर) होणाऱ्या अंतिम सामन्याकडे लागल्या आहेत. दरम्यान, क्रिकेट वर्ल्डकप मधील फायनल पाहायला जाणाऱ्या प्रेक्षकांसाठी मध्य रेल्वेने स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्पेशल ट्रेन मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अहमदाबाद दरम्यान धावणार आहे. 18 नोव्हेंबरला रात्री सीएसएमटी स्थानकावरुन ही ट्रेन अहमदाबादला रवाना होईल. सामना संपल्यानंतर म्हणजेच रविवारी मध्यरात्री ही ट्रेन अहमदाबादहून सुटेल आणि सीएसएमटीला पोहोचेल.
पंतप्रधान मोदी यांच्यासह सचिन, धोनी राहणार उपस्थित
अहमदाबाद येथे होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताला पाठिंबा देण्यासाठी एक लाखांहून अधिक लोक मैदानात येणार आहेत. अशा परिस्थितीत हा सामना पाहण्यासाठी बीसीसीआयने अनेक मान्यवरांना निमंत्रित केले आहे. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. याशिवाय टीम इंडियाचा महेंद्रसिंग धोनी, कपिल देव, सचिन तेंडुलकर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जय शहा, राजीव शुक्ला हे प्रमुख व्यक्ती उपस्थित राहू शकतात. याशिवाय, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह बॉलिवूड कलाकार अंतिम सामना पाहण्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.