नाही, हो म्हणता म्हणता बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाली. तशी ती या घडीला अनपेक्षितच. प्रचाराची तयारी येथपासून उमेदवार निश्चितीपर्यंत. उच्च न्यायालयानेही हिरवा कंदील दाखवला. आता अवधी उरला केवळ चार-पाच दिवसांचाच. त्यात भर म्हणून राष्ट्रीय पक्षांनी कधी नव्हे ते शड्डू ठोकले आहेत. मनपाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना! अशावेळी शहरातील मराठी भाषिकांची खऱया अर्थाने कसोटीच. तेव्हा गरज आहे ती मराठी भाषिकांच्या एकीच्या वज्रमुठीचीच! अर्थात हे आहे तुमच्यावरच.पहिला मुद्दा आहे तो राष्ट्रीय पक्षांचा. पालिका निवडणुकीतील प्रश्न असतात ते स्थानिक प्रश्नांचे, त्यांच्या सोडवणुकीसंदर्भातील. अशावेळी खऱया अर्थाने स्थानिकांवरच मदार असते. थोडक्मयात सांगायचे तर लोकसभेतील खासदार देशातील राष्ट्रीय पक्षांना प्राधान्य देतात तर विधानसभा सदस्य राज्याच्या हिताबद्दल आणि स्थानिक स्वराज्य संस्था पूर्णपणे स्थानिक हितसंबंधांना प्राधान्य देतात आणि तसेच संकेत आहेत. देशातील राज्यकर्त्यांची तशी भूमिका असली तरी अलीकडे ग्रामपातळीपर्यंतही राष्ट्रीय पक्षांची लुडबुड सुरू असते. या पार्श्वभूमीवर यावेळी महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात राष्ट्रीय पक्षांनी उडी घेतलेली आहे.शहरातील व सीमाभागातील राष्ट्रीय पक्षांचा आतापर्यंतचा इतिहास बहुतेकांना ठाऊक आहेच. त्याचे कटू अनुभव आलेले आहेत. यामध्ये एक नव्हे तर दोन-तीन राष्ट्रीय पक्ष आहेत. महानगरपालिका बरखास्तीच्या घटना नक्कीच स्मरणात असतील. गैरव्यवहार नाहीत केवळ राजकीय कारणांवरून घडलेले आहे. मनपा निवडणुकीचा विचार करताना मतदारांसमोर प्रश्न पडतो तो निवडून येणारा नगरसेवक विश्वासपात्र आहे का? प्रामाणिकपणे समस्या हाताळण्याचे कर्तृत्व आहे की नाही? आणखी महत्त्वाचे म्हणजे त्या उमेदवाराला आपण ओळखत आहे की नाही? राष्ट्रीय पक्षांचे नेते आणि त्यांच्या छायाचित्रांच्या भांडवलावर मतदारांचा विश्वास असतोच, असे छातीठोकपणे सांगता येणार नाही. त्यासाठीच राष्ट्रीय पक्षांना या रिंगणापासून दूर ठेवावेच लागेल. यावेळी खरी सत्त्वपरीक्षा आहे, ती एकी अभेद्य राहण्याचीच! मागील वेळी त्यामुळेच सलग चार महापौर आणि पाच उपमहापौर मराठी भाषिक म्हणून विराजमान झाले होते. आता त्याची पुनरावृत्ती होणे सर्वस्वी तुम्हा साऱयांच्याच हातात आहे. त्यासाठी फाटाफुटी, फंदफितुरीला कोणत्याही परिस्थितीत थारा मिळणार नाही, अशी डोळय़ात तेल घालून खबरदारी घ्यावी लागेल. परस्परांची उणीदुणी काढण्याची ही वेळ नव्हे. आत्मपरीक्षण करावे लागेल. उमेदवार निवडताना तुमच्या वॉर्डातील स्थानिक कार्यकर्ते आणि पंचमंडळींनी एकत्र येऊन उमेदवाराचे नाव एकमुखाने संमत केले असेल तर कोणताच प्रश्न नाही. एक एक वॉर्डात बहुसंख्येने उमेदवार उभे आहेत. राष्ट्रीय पक्षांना आव्हान देण्यासाठी एकच उमेदवार हवा. रात्र थोडी सोंगे फार अशी अवस्था झालेली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. एक-दोन दिवसातच एकत्र येऊन एकाच उमेदवारावर शिक्कामोर्तब करावे लागणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नि÷ावंत कार्यकर्ते प्रयत्नांची शिकस्त करीत आहेत. त्यांना एकदिलाने सहकार्य करावे. काही वॉर्डांमधील मतदार चार-पाच गल्ल्यांमध्ये विखुरलेले आहेत. काही ठिकाणी एक गल्ली एकाच्या पाठीमागे तर दुसरी तिसऱयाच्याच! त्यातूनच विसंवादी सूर उमटू लागले आहेत. तेव्हा सर्वसंमत कोण असा प्रश्न साहजिकच उभा ठाकतो. परिस्थिती जटिल होते. काय करणार? त्याची उकल होऊ शकते. वॉर्डामधील संबंधित गल्लीच्या पंचांना एका बैठकीत एकत्र आणून मार्ग काढता येतो, हे सारे तुमच्याच हातात आहे की नाही? तर मग वेळ दवडू नका. मी मोठा, तू मोठा असे स्वयंघोषित होऊ नका. मराठी माणसांचेच नव्हे तर महाराष्ट्र एकीकरण समितीचेच हित या व्यापक दृष्टीकोनातून एकत्र येणार की नाही? स्मार्ट सिटीच्या नावावर बेळगाव भकास होण्याच्या मार्गावर आहे. हे सांगण्याची गरज नाही. सर्वसामान्य नागरिकांचे शिव्याशाप काय सांगतात? स्वच्छ प्रतिमा, प्रामाणिकपणा आणि पारदर्शी कारभार या त्रिसूत्रीवर मनपाचे भवितव्य अवलंबून असते. हे सारे केवळ महाराष्ट्र एकीकरण समितीकडेच आहे. सत्ता हे लक्ष्य नव्हे तर उदात्त ध्येय या पायावरच म. ए. समिती स्थापन झालेली आहे. राष्ट्रीय पक्षांकडे काय आहे आणि ते काय करीत आहेत, त्याची पुनः पुन्हा आठवण करून देण्याची आवश्यकता नाही. आता एकच सांगणे, रातोरात उभारले जाणारे अनधिकृत झेंडे आणि पुतळे, त्या अनधिकृत झेंडय़ांच्या आणि पुतळय़ांच्या संरक्षणासाठी उभी केली जाणारी पोलिसांची फौज, त्याच्याविरुद्ध ‘ब्र’ काढल्यास मराठी भाषिकांची सोलली जाणारी चामडी याचा विसर पडू न देता एकदिलाने एकत्र येऊन म. ए. समितीनि÷ मराठी भाषिक उमेदवारांच्या पाठीशी पहाडासारखे उभे रहा! एकीची वज्रमूठ अभेद्य ठेवा.
Previous Articleइम्युनिटी
Next Article पॅराऑलिम्पिक्समध्ये भारताला दोन पदके,
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.
Related Posts
Add A Comment