मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा : 10 व्या मानांकित त्सुनेयामावर मात
क्वालालंपूर / वृत्तसंस्था
भारतीय बॅडमिंटनपटू प्रणॉयचा सनसनाटी विजय, हे बुधवारपासून सुरू झालेल्या मलेशिया मास्टर्स स्पर्धेचे पहिल्या दिवसाचे ठळक वैशिष्टय़ ठरले. प्रणॉयने जागतिक क्रमवारीतील सहाव्या मानांकित कान्टा त्सुनेयामाला 21-9, 21-17 अशा फरकाने पराभवाचा धक्का दिला. महिला गटात पीव्ही सिंधू व सायना नेहवाल यांनीही दुसऱया फेरीत धडक मारली.
जागतिक क्रमवारीत सध्या 26 व्या स्थानी असलेल्या प्रणॉयला विजय संपादन करण्यासाठी अवघी 26 मिनिटे पुरेशी ठरली. पण गुरुवारी दुसऱया फेरीत त्याची दुसऱया फेरीतील लढत प्रतिस्पर्धी केन्टो मोमोटो या जापनीज खेळाडूविरुद्ध होणार आहे वर्ल्ड चॅम्पयिनशिप मधील कांस्यपदक विजेता बी. साई प्रणित व किदांबी श्रीकांत यांचे आव्हान मात्र संपुष्टात आले आहे.
विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन पीव्ही सिंधूने पस्तीस मिनिटात रशियाच्या इव्हेगेनिया कोसेत्स्कायाला 21-15, 21-13 अशा फरकाने पराभूत केले. आता गुरुवारी दुसऱया फेरीतील लढतीत तिचा मुकाबला जपानच्या अया आहोरी हिच्याविरुद्ध होईल. लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यविजेती सायना नेहवालला देखील दुसऱया फेरीत पोचण्यासाठी 36 मिनिटांचा खेळ पुरेसा ठरला. तिने बेल्जियमच्या लियन तान हिला 21-15, 21-17 अशा फरकाने पराभूत केले.
सिंधू व सायना यांना अलीकडील काही स्पर्धांमध्ये सातत्याने अपयशाला सामोरे जावे लागले आहे. मागील महिन्यातच वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेतही त्यांना मागील यश कायम राखता आले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेत यश खेचून आणण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. बुधवारी बी. साई प्रणितला डेन्मार्कच्या रासमसविरुद्ध पहिल्याच फेरीत 11-21, 15-21 तर श्रीकांतला चायनीज तैपेईच्या चोऊ तिएन चेनविरुद्ध 30 मिनिटात 17-21, 5ö21 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला.