कुडाळ पं. स. कर्मचाऱयाला फटका : कोवाड येथे घडला प्रकार : बँक अन् पोलिसांचीही उदासिनता
प्रतिनिधी / कुडाळ:
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कुडाळ-पानबाजार येथील शाखेत खाते असलेल्या कुडाळ पं. स. बांधकाम विभागातील शिपाई चंद्रकांत भैरू पाटील यांच्या खात्यातून कोवाड (कोल्हापूर) येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून अज्ञाताने परस्पर 18 हजार 200 रु. रक्कम काढली. याबाबत पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार देऊन पंधरा दिवस झाले, तरी कार्यवाही झालेली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
चंद्रकांत पाटील पैसे काढण्यासाठी येथील पानबाजारमधील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये 4 जानेवारी 2020 रोजी दुपारी 3.15 वाजता गेले. ते पैसे काढण्याच्या तयारीत असताना अचानक एक अनोळखी व्यक्ती आत आली. ‘काका, मी तुम्हाला मदत करतो. मला पण अर्जंट आहे’, या त्याच्या बोलण्यावर त्यांनी विश्वास ठेवला. त्याच्यासमोरच कोड नंबर टाईप केला. त्यांचे पैसे आले. ते पैसे घेत असताना त्याने हातचलाखी करीत त्यांचे कार्ड घेऊन दुसरे बनावट कार्ड त्यांना दिले. त्यानंतर 7 जानेवारी रोजी पैसे काढण्यासाठी ते एटीएममध्ये गेले. पण ते कार्ड चालले नाही, म्हणून बँक व्यवस्थापकांना भेटले. त्यावेळी त्यांनी हे कार्ड बनावट आहे, असे सांगून तुमच्या एटीएमचा वापर करून कोवाड येथील एटीएममधून 5 जानेवारी रोजी सायंकाळी 5.33 वाजता 18 हजार 200 रु. काढण्यात आल्याची माहिती दिली. ही तक्रार देण्यासाठी ते कुडाळ पोलीस ठाण्यात गेले. तेथे त्यांनी तक्रार न घेता कोवाडला जाऊन तक्रार द्या, असे सांगितल्याने आपल्याकडे न्याय मागत आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात पाटील यांनी म्हटले आहे.
न्याय मागायचा तरी कोणाकडे?
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कुडाळ येथील शाखाधिकाऱयांना आपण भेटलो. एटीएममधील सीसीटीव्ही फूटेज बघा, असे सांगितले असता, पोलीस आम्हाला सांगत नाहीत, तोपर्यंत आम्ही सीसीटीव्ही फूटेज बघू शकत नाही, असे सांगून दुर्लक्ष केले, तर कुडाळचे पोलीस सांगतात, जिथे गुन्हा घडला, तिथे तक्रार करा. पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन पंधरा दिवस झाले. मग न्याय मागायचा तरी कोणाकडे?, असा सवालही पाटील यांनी केला आहे.