पाटणा
एनआरसी संबंधी संजदची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. तर नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर (एनपीआर) करता यापूर्वी निर्धारित मापदंडांचे पालन केले जावे. नव्या तरतुदी जोडण्यात आल्याने लोकांमध्ये भ्रम निर्माण होतोय, असे नितीश कुमार यांनी मंगळवारी म्हटले आहे. जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमाम प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा करू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
बिहारमध्ये एनआरसी राबविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एनआरसी संबंधी निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केले आहे. एनपीआर व्यवस्था नवी नसून ती 2011 पासून लागू आहे. पण एनपीआरमध्ये नव्याने जोडण्यात आलेल्या तरतुदींमुळे गोंधळ निर्माण होतोय, असे नितीश म्हणाले.
जुने स्वरुप लागू करावे
एनपीआरमध्ये नव्या बाबींचा अंतर्भाव करण्यात आल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. आईवडिलांचा जन्म कुठे झाला याची माहिती गरिबांना नसते. एनपीआरचे जुने स्वरुपच लागू केले जावे. एनपीआरमध्ये संबंधित प्रश्नाला उत्तर न देण्याचा पर्याय उपलब्ध असला तरीही गोंधळ राहणार आहे. सद्यकाळात निर्माण झालेली स्थिती योग्य नसल्याचे नितीश यांनी म्हटले आहे.