प्रतिनिधी /बेळगाव :
सध्या रेशनकार्डवर बीपीएल कार्डधारकांना म्हणजे दारिद्रय़रेषेखालील लोकांना तांदूळ देण्यात येत आहेत. कुटुंबात जितके सदस्य त्यांना प्रत्येकी पाच किलो तांदूळ दिले जातात. परंतु कोरोनाचे संकट सर्वांना असल्याने एपीएल कार्डधारकांनासुद्धा तांदूळ आणि रेशनचे धान्य मिळावे, अशी मागणी होत आहे.
बीपीएल कार्डधारकांसाठी अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून तांदूळ दिले जात आहेत. प्रत्येकी पाच किलाप्रमाणे 25 ते 30 किलो तांदूळ एका बीपीएल कार्डधारकांना मिळत आहेत. तर एपीएल कार्डधारकांना 15 रुपये किलोप्रमाणे एक किलो तांदूळ मिळत आहे.
कोरोनामुळे बीपीएल कार्डधारकांप्रमाणेच एपीएल कार्डधारकसुद्धा अडचणीत आले आहेत. त्यांचेही व्यवसाय आणि काम बंद झाले आहेत. त्यांनासुद्धा सरकारच्या मदतीची गरज आहे. त्यांच्याकडून सरकार किलोला 15 रुपये हा दर घेत असून कोरोनाचे संकट टळेपर्यंत सरकारने एपीएल कार्डधारकांनासुद्धा आणि ज्यांना गरज आहे त्या सर्वांना रेशनवर विनामूल्य तांदूळ द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या विजया पाटील यांनी केली आहे.
कोरोनाचा त्रास सर्वांनाच असताना एपीएल, बीपीएल असा भेद केला जाऊ नये, बऱयाचदा बीपीएल कार्डधारक तांदळाची परस्पर विक्री करताना आढळून येतात हे सरकारने लक्षात घ्यावे आणि ज्यांना गरज आहे त्या सर्वांनाच तांदूळ देण्याची सोय करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.