नऊ मीटर उंचीचे रोड : वाहतूक प्रश्न मार्गी लागणार
वार्ताहर / कणकवली:
कणकवली शहरातील सर्व्हीस रोडच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व्हीस रोडच्या बाजूलाच फ्लायओव्हर ब्रीजच्या पिलरच्या दिशेने हा सर्व्हीस रोड रुंद करण्यात येत आहे. त्यामुळे कणकवली शहरात सध्या अरुंद असलेल्या सर्व्हीस रोडचा प्रश्न मार्गी लागणार आहे. मात्र, पावसाळय़ापूर्वी शहरातील सर्वच सर्व्हीस रोड रुंदीकरणाचे काम मार्गी लागण्याची शक्यता कमी आहे.
महामार्ग चौपदरीकरणांतर्गत शहरातील सर्व्हीस रोडची रुंदी नऊ मीटर असल्याचे महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱयांकडून सांगण्यात आले होते. फ्लायओव्हर ब्रीजचे काम सुरू असल्याने वाहतूक सुरू ठेवण्यासाठी सध्या असलेला सर्व्हीस रोड अरुंद असल्याने अनेकदा वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत होती. मात्र, आता नऊ मीटर सर्व्हीस रोड रुंद झाल्यानंतर ट्रफिकचा प्रश्न मार्गी लागणार आहे. मे महिन्यापर्यंत फ्लायओव्हर ब्रीजचे काम पूर्ण करण्याचे ठेकेदार कंपनीचे उद्दिष्ट होते. मात्र, लॉकडाऊनमुळे काम महिनाभर बंद राहिल्याने पावसाळय़ात काम मार्गी लागण्याची शक्यता कमी आहे.
शहरात महामार्गालगतच्या गटारांची कामे सध्या हाती घेण्यात आली आहेत. मात्र, अनेक ठिकाणी गटाराचे काम झाल्यानंतरही रस्त्यावर व रस्त्याच्या बाजूला टाकलेली माती अद्याप हटविण्यात आलेली नाही. गटारांची कामे अर्धवट स्थितीत असल्याने गटाराच्या पलिकडे असलेल्या अनेक दुकानांमध्ये जाण्याची अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे पावसाळय़ापूर्वी रस्त्यावरील माती हटविण्याची मागणी केली जात आहे.
गटारांचा प्रश्न कायम
पटवर्धन चौकातील गटाराचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. आचरा रोडवरून येणारे पाणी जानवली नदीच्या दिशेने जाण्यासाठी गटाराचे बांधकाम अर्धवट स्थितीत करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळय़ात पटवर्धन चौकात पाणी साचण्याची शक्यता आहे. आचरा रोडवरून येणाऱया पाण्याला जानवली नदीच्या बाजूला जाण्यासाठी तेथील गटार मोकळे करण्याची गरज आहे. तसेच फ्लायओव्हर ब्रीजखालील भागातून करण्यात आलेले पर्यायी मार्ग सुस्थितीत करण्याची कार्यवाहीही पावसाळय़ापूर्वी करण्याची मागणी केली जात आहे. सद्यस्थितीत फ्लाय ओव्हर ब्रीजखाली रस्ते खोदाई करून ठेवण्यात आले असून पावसाळय़ात येथे पाणी साचून जनतेला त्रास होणार आहे.