दोन विधानसभा तर चार विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक जाहीर
प्रतिनिधी/ बेंगळूर
मागील वर्षभरापासून रिक्त असलेल्या बेंगळूरमधील राजराजेश्वरीनगर आणि आमदार सत्यनारायण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या तुमकूरमधील सिरा विधानसभा मदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर राज्य विधानपरिषदेच्या आग्नेय पदवीधर मतदारसंघ, पश्चिम पदवीधर मतदारसंघ तसेच बेंगळूर शिक्षक मतदारसंघ व ईशान्य शिक्षक मतदारसंघांसाठी देखील निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधानपरिषदेच्या या चार जागांसाठी 28 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.
विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील प्रत्येकी दोन जागांसाठी 1 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी होणार असून या दिवसापासूनच उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर असून 9 रोजी अर्ज छानणी होईल. माघार घेण्यासाठी 12 ऑक्टोबर अंतिम मुदत आहे. 28 रोजी मतदान होणार आहे. या दिवशी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होईल. 2 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल.
विधानसभेच्या दोन जागांसाठी 9 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी होईल. 16 ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. 17 रोजी अर्ज छाणनी होईल. 19 ऑक्टोबर अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. 3 नोव्हेंबर रोजी मतदार होईल. तर 10 रोजी मतमोजणी होणार आहे.
आर. चौडरेड्डी (आग्नेय पदवीधर मतदारसंघ), एस. व्ही. संकनूर (पश्चिम पदवीधर मतदारसंघ) तसेच शरणप्पा मट्टूर (ईशान्य शिक्षक मतदारसंघ) व पुट्टण्णा (बेंगळूर शिक्षक मतदारसंघ) यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ 30 जून 2020 रोजीच संपुष्टात आला होता. कोरोना परिस्थितीमुळे येथे निवडणुका घेणे शक्य झाले नव्हते. आता आरोग्यविषयक सुरक्षा मार्गसूचीनुसार या चार जागांसाठी निवडणूक घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यात भाजप सत्तेवर येण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या आमदारांपैकी एक असणारे मुनिरत्न यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे बेंगळूरच्या राजराजेश्वरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या मतदारसंघातील निवडणुकीसंबंधीचा वाद न्यायप्रविष्ट असल्याने यापूर्वी येथे इतर मतदारसंघांप्रमाणे पोटनिवडणूक जाहीर घेण्यात आली नव्हती. आता येथील वाद निकाली निघाला आहे. त्याचप्रमाणे तुमकूर जिल्हय़ातील सिरा मतदारसंघातील आमदार सत्यनारायण यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे येथे देखील पोटनिवडणूक होणार आहे.