बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी गुरुवारी सायंकाळी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, बसव कल्याणचे आमदार बी. नारायण राव आणि राज्यसभा सदस्य अशोक गस्ती यांना श्रद्धांजली वाहिली.
मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि राज्याचे कायदामंत्री मधुस्वामी यांनी मुख्यमंत्र्यांच्या बेंगळूर येथील निवासस्थानी दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली वाहिली.
कोरोनामुळे बुधवारी सायंकाळी निधन झालेले सुरेश अंगडी बेळगावचे खासदार होते. ते गेले चार वेळा भाजपचे खासदार होते. गेल्या आठवड्यात अंगडींना कोरोनाची लग्न झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांना उपचारासाठी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल केले होते.
तसेच कोरोनावर मणिपाल रुग्णालयात उपचार घेत असलेले कॉंग्रेसचे आमदार बी. नारायण राव यांचे गुरुवारी निधन झाले. उत्तर कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील बासवकल्याण मतदार संघाचे आमदार होते. १ सप्टेंबर रोजी कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.
दरम्यान भाजपचे राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार अशोक गस्ती यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. १७ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.