बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे ग्रामविकास मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने मंगळवारी केंद्रीय आदिवासी कार्य राज्यमंत्री रेणुका सिंह यांची नवी दिल्लीत येथे भेट घेऊन कुरुबा (मेंढपाळ) समुदायाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी केली.
या शिष्टमंडळात निरंजनानंदापुरी स्वामी, कॉंग्रेस नेते एच. एम. रेवण्णा आणि इतरांचा समावेश होता. कुरुबा समाजाला एसटी गटात समाविष्ट करण्याच्या राज्याच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागणीचा विचार करण्यासाठी या शिष्टमंडळाने आदिवासी कार्यमंत्र्यांना निवेदन दिले.
२ ऑक्टोबर रोजी, शेल्फर्ड्स इंडिया इंटरनॅशनलने बेंगळूर येथे आयोजित पाचव्या वार्षिक अधिवेशनात कुरुबा समाज वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. तो इथूनपुढे अनुसूचित जमाती (एसटी) या नावाने ओळखला जावा अशी मागणी केली.
असोसिएशनचे अध्यक्ष असलेले भाजप एमएलसी ए.एच. विश्वनाथ यांनी प्रत्येक कुरुबा समुदायाला एका गटात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अंदाजानुसार देशात १२ कोटी समुदाय या जातीचे आहेत. आम्ही केंद्र सरकारला या समुदायाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा अशी विनंती करतो, असे ते म्हणाले. कर्नाटकात कुरुबाचे इतर मागासवर्गीयांमध्ये वर्गीकरण केले आहे.