प्रतिनिधी /फोंडा
राजीव गांधी कला मंदिर, फोंडा आयोजित 13 व्या राज्यस्तरीय महिला फुगडी स्पर्धेत श्री पारवडेश्वर महिला मंडळ, बाहेरीलवाडा, केरी सत्तरी या पथकाला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. त्यांना रु. 30,000 व फिरता चषक प्रदान करण्यात आला. स्पर्धेची अंतिम फेरी व बक्षीस वितरण सोहळा काल रविवारी कला मंदिरमध्ये पार पडला. राज्यभरातील एकूण 80 पथकांनी स्पर्धेत भाग घेतला होता. त्यापैकी 12 पथकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती.
स्पर्धेचे द्वितीय पारितोषिक सातेरी कला संघ, गोठावाडा-बेतोडा यांना तर तृतीय ज्ञानज्योती महिला मंडळ, घोटेली केरी सत्तरी यांना मिळाले. उत्तेजनार्थ प्रथम गुरु कला मंडळ, पिसगाळ प्रियोळ, द्वितीय रवळनाथ महिला भजनी मंडळ नावेली, डिचोली व तृतीय श्री ब्राह्मण नरसिंह सातेरी चिकोलकार पथक, चिकली वास्को यांना देण्यात आले. उत्कृष्ट गायनासाठी प्रथम ज्ञानज्योती महिला मंडळ, द्वितीय हनुमान सेल्फ हेल्प ग्रुप, पिर्ण, बार्देश तर तृतीय श्री अंनत साई महिला मंडळ, सावईवेरे यांना मिळाले.
बक्षीस वितरण सोहळय़ाला कला व संस्कृती मंत्री तथा कला मंदिरचे अध्यक्ष गोविंद गावडे, फोंडय़ाचे आमदार रवी नाईक, उपाध्यक्ष शांताराम कोलवेकर, कला मंदिरच्या सदस्य सचिव स्वाती दळवी, आयोजन समितीचे सदस्य नारायण नाईक, चेतन खेडेकर, महेश सतरकर, सर्वानंद कुर्पासकर व प्रतिभा नाईक हे उपस्थित होते. राज्यातील कलाकार व विविध कलांना प्रोत्साहन देण्यासाठी कला व संस्कृती खात्यातर्फे प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या जातील. कलाकारांनी त्यासाठी पुढे येण्याचे आवाहन मंत्री गोविंद गावडे यांनी यावेळी बोलताना केले. गोव्याची संस्कृती व परंपरा राखण्यासाठी लोककलांचा वाटा मोठा असून हा वारसा नवीन पिढीच्या कलाकारांनी पुढे न्यावा, असे आमदार रवी नाईक म्हणाले. शांताराम कोलवेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश वेळगेकर यांनी तर स्वाती दळवी यांनी आभार मानले.