तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
तीन महिन्यांपूर्वी शंभर रुपये किलोने विकलेल्या कांद्याचा भाव अचानक गडगडला होता. त्यानंतर काही दिवस भाव स्थिर राहिले. पुन्हा शनिवारी कांद्याने उसळी मारली असून, प्रतिक्विंटल सरासरी 1 हजार 600 तर सर्वाधिक 3 हजार 200 रुपये क्विंटलने विकला. किरकोळ बाजारात हा दर 50 रुपयांच्या पुढे आहे.
यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात कांद्याचा दर वाढत गेला होता. डिसेंबर महिन्यात कांद्याला प्रति क्विंटल वीस हजार रुपये भाव मिळाला होता. संपूर्ण डिसेंबर महिन्यात कांद्याचा दर सर्वाधिक 10 हजार रुपयांपेक्षा अधिक राहिला. त्यानंतर मात्र जानेवारीत कांद्याची आवक वाढत गेल्याने कांद्याचे दरही घसरण्यास सुरूवात झाली. 20 जानेवारीपर्यंत प्रति क्विंटलला पाच हजार रुपये असलेला दर कमी कमी होत गेला. गत पुन्हा कांद्याने उसळी मारली असून, भाव सावरत 3 हजार 200 रुपयांवर आला आहे. गत आठवडय़ात प्रतिक्विंटलला सर्वाधिक 3 हजार 500 रुपयेच्या जवळपास कांद्याला दर मिळाला आहे. शनिवारी बाजार समितीत 372 ट्रकची आवक झाली होती. त्याचे वजन 37 हजार 260 क्विंटल इतके झाले.
शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीत 200 रुपये किमान, सर्वसाधारण 1 हजार 600 रुपये, तर कमाल 3 हजार 200 रुपये प्रति क्विंटल दराने कांद्याची विक्री झाली. एका दिवसात 59 कोटी 61 लाख सहा हजार रुपयांची उलाढाल झाली आहे.