माजी आमदार विजय पै खोत यांचा पवित्रा : राष्ट्रीय पक्षांकडून ‘ऑफर’, पण पक्षाची शिडी वापरणार नाही
प्रतिनिधी /काणकोण
आगामी विधानसभा निवडणूक काणकोण मतदारसंघातून अपक्ष म्हणूनच आपण लढविणार असून आपल्या समर्थकांची देखील तशीच इच्छा असल्याचे मत माजी आमदार विजय पै खोत यांनी या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.
दोन वेळा काणकोण मतदारसंघाचे भाजपाचे आमदार म्हणून आपण काम केलेले असून केवळ दोन वर्षे सोडल्यास बाकीची आठ वर्षे आपल्याला विरोधी गटातच राहून काम करावे लागले. अल्पकाळ सत्तेत असूनही चावडीवरील कदंब बसस्थानक, सामाजिक आरेंग्य केंद्राची भव्य अशी इमारत आपल्याच कारकिर्दीत आणि आपण साधनसुविधा महामंडळाचे उपाध्यक्ष असताना पूर्ण झाली. त्याचा आपल्याला अभिमान वाटतो, असे पै खोत पुढे म्हणाले.
आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत आणि त्याअगोदर काणकोण पालिकेचे नगरसेवक म्हणून काम करताना कधीच सुडाचे राजकारण आपण केले नाही. सरकारी अधिकाऱयांशी आणि सर्वसामान्य कर्मचाऱयांशी नेहमीच सलोख्याचे संबंध ठेवले आणि तीच पुंजी घेऊन आपण सध्या पुढे जात आहे. या मतदारसंघातील प्रत्येक घरात पाय ठेवत असताना आपले कोण आणि परके कोण याचा अनुभव आपल्याला मिळत आहे. याच समर्थकांच्या जोरावर आपला विजय हा निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे अधिकृत उमेदवार आपण होतो. परंतु माजी मंत्री रमेश तवडकर यानी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. मते विभागली आणि दोघांचे भांडण, तिसऱयाचा लाभ या उक्तीनुसार भाजपाच्या मुठीतील मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात गेला. त्याच तवडकर यांना भाजपाच्या राज्य समितीवर उपाध्यक्ष म्हणून बढती मिळते. अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे आयुक्तपद दिले जाते. यावर आपण काय बोलणार, असा सवाल पै खोत यांनी केला. आपल्याला राष्ट्रीय पक्षांच्या ऑफर येत आहेत. परंतु आपण कोणत्याच पक्षाची शिडी न वापरता अपक्ष म्हणूनच निवडणूक लढविणार आहे. यावेळची निवडणूक आपण जिंकण्यासाठीच लढविणार, असे त्यांनी सांगितले.