प्रतिनिधी / कारवार
वास्को-गोवा येथील विद्यार्थ्यांना एसएसएलसीची परीक्षेची व्यवस्था कारवार तालुक्यातील उळगा येथील परीक्षा केंद्रावर करण्याऐवजी गोव्यातच करावी, अशी मागणी उळगा येथील ग्रामस्थांनी कारवार जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. हरीशकुमार के. यांची भेट घेऊन सादर केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, कर्नाटक राज्य दहावी अभ्यासक्रमाच्या गोव्यातील विशेष करून वास्को येथील विद्यार्थी वार्षिक परीक्षा गेल्या अनेक वर्षापासून कारवार तालुक्यातील उळगा येथील श्री शिवाजी सेकंडरी स्कूलमधील परीक्षा केंद्रातून देत असतात. येत्या 25 तारखेरपासुन सुरू होणाऱया या परीक्षेला गोव्यातील (वास्को) 54 विद्यार्थी हजर राहणार आहेत. तथापी यावर्षी परिस्थिती एकदम गंभीर असल्याने गोव्यातील विद्यार्थ्यांना उळगा येथील केंद्रावर परीक्षा देण्यात आपला कडाडून विरोध आहे, असे स्पष्ट करून ग्रामस्थांनी पुढे असे म्हटले आहे की, गोव्यात विशेष करून वास्को येथे कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. वास्को शहराचा परिसर कोरोना हॉटस्पॉट म्हणून ओळखला जात आहे. वास्कोहून येणाऱया विद्यार्थ्यांबद्दल छातीठोकपणे काही एक सांगता येत नाही. उळगा येथील परीक्षा केंद्रावर स्थानिक शेकडो विद्यार्थी एसएसएलसीच्या परीक्षेला सामोरे जाणार आहेत. आणि जर का स्थानिक विद्यार्थी वास्को येथील विद्यार्थ्यांच्या संपर्कात येऊन जर का काहीतरी भलेबुरे घडले तर स्थानिक विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊन त्यांना एक वर्ष मुकण्याची शक्यता नाकारत येत नाही. आणि म्हणूनच वास्को येथील विद्यार्थ्यांची उळगा येथील परीक्षा केंद्राऐवजी गोव्यातच व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.
वास्कोतील विद्यार्थी उळगा येथे दाखल होणार म्हणून स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. सदाशिवगड परिसरातील गोव्यात शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांसाठी गोवा सरकारने दहावीच्या वार्षिक परीक्षेची व्यवस्था कारवार तालुक्यातील माजाळी येथे केली होती. त्याप्रमाणे वास्को येथील विद्यार्थ्यांसाठी गोव्यातील काणकोण किंवा अन्यत्र करावी, अशी मागणी पुढे निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी कारवार तालुका पंचायतीच्या अध्यक्षा प्रमिला नाईक, निवृत्त प्राचार्य एल. एन. गावकर, निवृत्त आयआरएस अधिकारी दिलीप नाईक, विठोबा नाईक आदी उपस्थित होते..