पॉझिटिव्ह रेटचे प्रमाण 40 वरून 31 टक्क्यांवर : जिल्हाधिकारी मलै मुगीलन यांची माहिती, आठवडय़ातील तीन दिवस कडक लॉकडाऊन
प्रतिनिधी / कारवार
जिल्हय़ात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. गुरुवारअखेर जिल्हय़ात 5 लाख 33 हजार 353 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी 44 हजार 796 नागरिक कोराना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सुरुवातीला जिल्हय़ात पॉझिटिव्ह रेटचे प्रमाण 40 ते 42 टक्के इतके होते. आता हे प्रमाण 31 टक्के झाले आहे, अशी माहिती कारवार जिल्हाधिकारी मलै मुगीलन यांनी दिली.
जिल्हय़ातील कोरोना परिस्थितीबद्दल अधिक माहिती देताना ते म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोना महामारीच्या विरोधात लढत आहे. कारवार जिल्हाही या महामारीच्या दुसऱया लाटेच्या विरोधात सलगपणे लढत आहे. प्रज्ञावंत जिल्हावासियांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन केल्याने कोरोनाच्या प्रमाणावर नियंत्रण मिळविणे शक्य होत आहे, असा आशावाद व्यक्त करून ते पुढे म्हणाले, जिल्हा प्रशासनही प्रामुख्याने कोरोनाची बाधा झालेल्यांची आणि बाधितांच्या संपर्कात आलेल्यांची ओळख पटवून अशा नागरिकांचे होमक्वारंटाईन करीत आहे. कोरोनाबाधितांना रुग्णालय आणि कोविड सेंटरमध्ये दाखल करून अन्य नागरिक बाधित होणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे. कोरोना चाचणीचा अहवाल वेळेत उपलब्ध होत असल्याने बाधितांवर त्वरित उपचार करणे शक्य होत आहे. परिणामी कोरोनामुळे दगावणाऱयांच्या संख्येत घट होत आहे. जिल्हा पालकमंत्री शिवराम हेब्बार यांच्या सूचनेनुसार लॉकडाऊन, सिलडाऊनची घोषणा करण्यात येत आहे. जिल्हावासीय लॉकडाऊन किंवा सिलडाऊनचे काटेकोरपणे पालन करीत असल्यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येला ओहोटी लागली आहे.
सर्वांचे मानले आभार
कोरोना विरोधातील लढाईत उतरलेल्या जिल्हावासियांचे, लोकप्रतिनिधींचे, कोरोना वॉरियर्स, डॉक्टर परिचारिका, आरोग्य खात्याचे अधिकारी, महसूल खाते, पंचायत राज खाते, महिला आणि बाल कल्याण खाते, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी आणि कर्मचाऱयांचे आभार मानलेल्या जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी माध्यमाच्या प्रतिनिधींचेही गुणगाण करून आभार मानले.
जनतेने गाफील राहू नये
जिल्हय़ात कोरोनाचे संकट नियंत्रणाखाली येत आहे म्हणून जिल्हावासियांनी गाफील राहू नये, असे आवाहन करून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, भविष्यात जिल्हावासियांनी कोरोनाबाबत दुर्लक्ष केल्यास आजअखेर केलेले प्रयत्न व्यर्थ जातील. त्यासाठी भविष्यातही जनतेने लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करून मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सामाजिक अंतर राखण्याचे भान ठेऊन कोरोनाची साखळी बेक करावी, असे त्यांनी पुढे सांगितले.