760 जण कोरोनामुक्त, 13 जणांचा मृत्यू : लॉकडाऊननंतरही रुग्णसंख्येत वाढ : सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याची मागणी
प्रतिनिधी / कारवार
कारवार जिल्हय़ात मंगळवारी 979 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर 760 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये कारवार तालुक्यातील 5, कुमठा व शिरसी प्रत्येकी दोन आणि हल्याळ, होन्नावर, भटकळ व सिद्धापूर तालुक्यातील प्रत्येकी एका मृताचा समावेश आहे.
जिल्हय़ात 10 तारखेपासून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जात आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हय़ातील काही स्वयंसेवी संस्थांकडून आणि जिल्हा प्रशासनाकडून सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तरीसुद्धा कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. परिणामी जिल्हय़ातील वैद्यकीय यंत्रणेवर ताण वाढत आहे. जिल्हा पालकमंत्री आणि मजूर मंत्री शिवराम हेब्बार यांच्या बरोबरीने जिल्हय़ातील आमदारही कोरोना नियंत्रणाखाली आणण्यासाठी आणि बाधितांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. तथापि सर्वजणांचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. कारण जिल्हय़ातील वैद्यकीय सुविधा उंचावण्यासाठी यापूर्वी जेवढे प्रयत्न व्हायचे तेवढे झाले नाहीत. गेल्या काही वर्षांपासून जिल्हय़ात सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची उभारणी करावी, अशी मागणी केली जात आहे. याबाबत चर्चा आणि घोषणाबाजीच्या पलीकडे काही झालेले नाही. याची फळे आज जिल्हावासियांना भोगावी लागत आहेत. यामुळे अनेकजण गोवा, उडुपी, मंगळूर, बेळगाव, हुबळी येथील रुग्णालयाकडे धाव घेत आहेत. तथापि गरीब आणि मागासवर्गियांना जिल्हय़ातील रुग्णालयातच उपचार घेण्यापलीकडे अन्य पर्याय नाही.
मूत आकडय़ांचा घोळ
बाहेर उपचार घेतलेल्यापैकी काही बरे होत आहेत तर काही कोरोनाला बळी पडत आहेत. जिल्हय़ाबाहेर रुग्णालयात दगावलेल्यांच्या आकडय़ाचा समावेश जिल्हय़ात मृत्यू झालेल्यांच्यात केला जात आहे की नाही हे कळायला मार्ग नाही. हा आकडय़ाचा समावेश केल्यास संख्या आणखीन वाढु शकते.
मंगळवारी जिल्हय़ात नोंद झालेल्या कोरोनाबाधितांमध्ये कारवार 155, अंकोला 69, कुमठा 41, होन्नावर 99, भटकळ 81, शिरसी 200, सिद्धापूर 64, यल्लापूर 63, मुंदगोड 51, हल्याळ 123 आणि जोयडा तालुक्यातील 33 बाधितांचा समावेश आहे.
760 जण कोरोनामुक्त
मंगळवारी जिल्हय़ात 760 जण कोरोनामुक्त झाले. यामध्ये कारवार 92, कुमठा 50, होन्नावर 21, भटकळ 37, शिरसी 75, सिद्धापूर 269, यल्लापूर 42, मुंदगोड 64, हल्याळ 85, जोयडा 25 तर अंकोला तालुक्यातील कांही जणांचा समावेश आहे.
सक्रियांच्या संख्येत वाढ
जिल्हय़ात सक्रिय बाधितांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. मंगळवारी जिल्हय़ातील सक्रिय बाधितांची संख्या 6,647 इतकी झाली आहे. यापैकी 491 बाधितांवर जिल्हय़ातील वेगवेगळय़ा रुग्णालयात 6,156 बाधितांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत.
मृतांची संख्या 325
जिल्हय़ातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 28,286 इतका झाला आहे. यापैकी 21,314 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर मंगळवार अखेर जिल्हय़ात 325 कोरोनाबाधित दगावले आहेत. यामध्ये हल्याळ तालुक्यातील 63, कारवार 53 जणांचा समावेश आहे.