मंत्री जगदीश शेट्टर : भूसंपादन प्रक्रिया लवकरच प्रारंभ करणार
प्रतिनिधी / बेंगळूर
केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत राज्यातील विमानतळांचा विकास केला जात आहे. या योजनेचा एक भाग म्हणून कारवार आणि बैंदूर येथे नागरी विमानतळ उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. यासाठी भूसंपादन प्रक्रिया लवकरच प्रारंभ करण्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री जगदीश शेट्टर यांनी दिली. मंगळूर येथे फिक्की यांच्यातर्फे आयोजिलेल्या ‘कर्नाटक कोस्टलाईन ब्युजिनेस कॉनक्लेव’चे उद्घाटन करून ते बोलत होते.
मंत्री शेट्टर पुढे म्हणाले, उडान योजनेंतर्गत हुबळी, बेळगाव येथील विमानतळांचा विकास साधण्यात आला आहे. दररोज याठिकाणी 15 ते 20 विमाने उड्डाण करीत आहेत. विमानतळांमुळे विविध व्यवसायांनाही फायदा होत आहे. मंगळूर जिल्हय़ात हजारो एकर जमीन मिळाल्यास याठिकाणी सर्वोत्कृष्ट औद्योगिक प्रकल्प उभारण्यास आम्ही तयार आहोत. जिल्हय़ातील बेळतंगडी, पुत्तूर तालुक्यात 200 एकर जमिनीची भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्याची सूचना अधिकाऱयांना केली आहे. आणखी हजारो एकर जमिनीची आवश्यकता आहे. भूसंपादन प्रक्रियेला चालना मिळाल्यास औद्योगिक क्षेत्रांचा विकासही वेगाने होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
उद्योगक्षेत्रे बेंगळुरातच केंद्रीयकृत झाली आहेत. यांच्या दुसऱया आणि तिसऱया टप्प्याचा विस्तार इतर शहरांमध्ये करण्याचा पुढाकार राज्य सरकारने घेतला आहे. हुबळी, धारवाड, मंगळूर आणि म्हैसूर शहरेही औद्योगिक क्षेत्रांमध्ये विकास साधणार आहेत. राज्यात 1.60 लाख कोटी रुपये औद्योगिक क्षेत्रात गुंतवणुकीचे प्रस्ताव आले आहेत. ही संख्या देशात सर्वाधिक असून कर्नाटकाने पहिला क्रमांक पटकाविला आहे, अशी माहितीही जगदीश शेट्टर यांनी दिली.