एखादा आमदार दोनच वेळा निवडून येण्याची परंपरा केली खंडित, मात्र काँग्रेसच्या अमित पाटकरकडून जोरदार लढत
प्रतिनिधी /कुडचडे
कुडचडेतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व भाजपात मुख्यत्वे झालेल्या लढतीत वीजमंत्री, कुडचडेचे आमदार आणि भाजप उमेदवार नीलेश काब्राल यांनी 9973 मते प्राप्त करत 672 मतांनी विजय नोंदविला आहे. कुडचडेत एक आमदार फक्त दोन वेळा निवडून येण्याची परंपरा त्यांनी मोडून टाकली आहे.
कुडचडेत सुमारे 80 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे उमेदवार संभ्रमात दिसू लागले होते. पण अखेर त्याचा निष्कर्ष मतमोजणीतून समोर आला आहे. पण दोन वेळा निवडून आलेल्या काब्राल यांनी प्रचाराच्या दरम्यान ज्या प्रकारे दावे केले होते ते फोल ठरले आहेत. कुडचडेतील जनादेश हा एक प्रकारे भाजपाला पुढे कुडचडेसाठी चांगल्या पद्धतीने कार्य करण्याच्या दृष्टीने इशाराही मानता येतो. कारण काब्राल हे भाजप सरकारात मंत्री असताना सुद्धा त्यांना इतकी कमी आघाडी मिळणे हे वेगळेच काही तरी दर्शवते अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
कुडचडेत एकूण सहा उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यात आरजीचे आदित्य देसाई हे राजकारणात नवीन असून सुद्धा कुडचडेतील जनतेने त्यांना तिसऱया क्रमांकावर ठेवले. त्याचबरोबर 2012 व 2017 साली ज्या पक्षाला जनतेने बाजूला केले होते त्या काँग्रेसच्या अमित पाटकर यांनी यावेळी काब्राल यांच्या जवळपास मते मिळवणे हाही त्यांच्यासाठी धक्काच आहे हे कोणी नाकारू शकत नाही. मतदान यंत्रात नोंद झालेल्या मतदानात अपक्ष राजू बोयर यांना 51, मगोला 307, आम आदमी पक्षाला 814, आरजीला 2063, तर काँग्रेसला 9113 व भाजपला 9501 अशी मते प्राप्त झाली.
टपाली मतदानात बोयर यांना एकही मत प्राप्त झाले नाही, तर मगोला, आपला 16, आरजीला 40, काँग्रेसला 188 व भाजपला 472 मते प्राप्त झालेली आहेत. यावरून कुडचडेतील मतदानाविषयी चर्चेला जोर आला आहे. भाजपचे विजयी झालेले उमेदवार काब्राल हे पुढील कार्य करताना या परिस्थितीची जाणीव ठेवतात की नाही त्याचप्रमाणे ते कुडचडेचा विकास करण्यास कसे प्राधान्य देतात ते येणाऱया काळात स्पष्ट होणार आहे.
आरजीच्या कामगिरीविषयी चर्चा
कुडचडेत सध्या आरजीला मिळालेल्या 2103 मतांसंबंधी चर्चा सुरू झाल्या आहेत. यामुळे भाजपच्या आघाडीवर परिणाम झाल्याची चर्चा चालू आहे. तसेच मगोची फारशी ठोस ताकद नसताना कुडचडे मतदारसंघात मगोचा उमेदवार देणे आणि सरकार घडविण्याचा दावा करणाऱया आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला फक्त 830 मते मिळणे हेही सध्या चर्चेचे विषय बनले आहेत. कुडचडेवासियांना यंदा बदल हवा असा दावा प्रचाराच्या दरम्यान केला होता. त्यामुळेच यंदाची निवडणूक चुरशीची झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.