घसघशीत वेतनवाढ शक्य : आगामी अर्थसंकल्पात विशेष तरतुदींचे संकेत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आगामी केंद्रीय अर्थसंकल्प केंद्रीय कर्मचाऱयांसाठी लक्ष्मीचे वरदान घेऊन येणार अशी शक्यता आहे. 1 फेब्रुवारीला मांडल्या जाणाऱया या अर्थसंकल्पात पेंद्रीय कर्मचाऱयांच्या वेतनात 21 हजार रुपयांपर्यंतची वाढ करण्याची तरतूद करण्यात येईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यात किमान 4 टक्क्यांची वाढ केली जाण्याची शक्यता आहे. या वाढीचा लाभ विद्यमान कर्मचाऱयांबरोबरच निवृत्त कर्मचाऱयांनाही मिळणार आहे. यामुळे साधारणतः 1 कोटी 10 लाख केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना मोठाच दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे सूत्राचे म्हणणे आहे. जर अशी तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली तर केंद्रीय कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्याची टक्केवारी सध्याच्या 17 वरून 21 वर पोहचणार आहे. याचा थेट परिणाम त्यांच्या मोठय़ा वेतनवाढीत होणार हे निश्चित आहे.
सातव्या वेतन आयोगाची सूचना
या महागाई भत्ता वाढीची सूचना 7 व्या वेतन आयोगाने केली होती. त्यावर केंद्र सरकारने सकारात्मक विचार चालविला आहे. याचे प्रत्यंतर येत्या अर्थसंकल्पात निश्चितपणे उमटेल असा विश्वास कर्मचाऱयांच्या संघटनांनीही व्यक्त केला आहे. अर्थात तो कितपत सार्थ ठरतो ते अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
जिव्हाळय़ाचा विषय
महागाई भत्ता हा नेहमीच केंद्रीय कर्मचाऱयांच्या जिव्हाळय़ाचा विषय राहिला आहे. सरकारही यासंबंधी संवेदनशील असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे महागाई भत्तावाढ निश्चित होणार असे वातावरण अर्थमंत्रालय परिसरात आहे. अनेक राजकीय व आर्थिक अभ्यासकांचेही असेच मत आहे.
वेतन किती वाढणार
केंद्रीय कर्मचाऱयांना मिळणाऱया मूळ वेतनाच्या विविध श्रेणी पाहिल्या तर 4 टक्के महागाईभत्ता वाढ याचा अर्थ किमान 720 रुपये ते 10 हजार रुपये वेतन वाढ मिळणार असा काढला जात आहे. उच्च वेतन असणाऱया कर्मचाऱयांचे वेतन तब्बल 21 हजार रुपयांनी वाढणार असल्याची चर्चा आहे. मात्र, काही तज्ञांनी, सरकार एवढी वाढ करू शकणार नाही, असेही मत व्यक्त केले आहे.
कर्मचाऱयांची मागणी मोठी
कर्मचारी संघटनांची मागणी मोठी आहे. महागाई वाढीच्या प्रमाणाचा विचार करता किमान 1000 रुपये तर जास्तीत जास्त 26 हजार रुपये वेतनवाढ मिळावी अशी त्यांची इच्छा आहे. मात्र ती पूर्ण होण्याची शक्यता दुरापास्त आहे. मात्र, सध्या सारे कर्मचारी मोठय़ा औत्सुक्याने आणि अपेक्षेने आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाकडे पाहत आहेत, असे वातावरण आहे.