बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक प्रशासकीय अधिकारी सुधा यांच्या निवासस्थानासह सहा ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी शनिवारी छापा टाकला. अचानक टाकलेल्या छाप्यांमधून मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने प्राप्त झाले आहे.
एसीबी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एका व्यक्तीने त्या अधिकाऱ्याविरुध्द तक्रार दाखल केली होती. त्यांच्याकडे असणाऱ्या ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता असल्याचा आरोप तक्रारीत केला होता.
तक्रारीच्या आधारे एसीबीने तपास सुरू केला आणि विविध ठिकाणी छापे टाकले. अधिकाऱ्यांनी शहरातील येळहंकाच्या कोडेगहळ्ळी येथील त्याच्या फ्लॅटवर तसेच बेंगळूर, म्हैसूर, उडपी येथील त्याच्या ओळखीच्या लोकांच्या निवासस्थानावर छापा टाकला. शांतीनगर येथील त्यांच्या कार्यालयातही हा छापा टाकण्यात आला.
एसीबीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जमीन, बाँड्स, शेअर्स इ. मध्ये केलेल्या गुंतवणूकीबाबत तपास केला जात आहे. सुधा सध्या माहिती व बायोटेक्नॉलॉजी विभागात प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी बेंगळूर विकास प्राधिकरणाचे भूसंपादन अधिकारी म्हणून काम केले आहे.