प्रतिनिधी /बेळगाव
केएलई सोसायटीच्या आरएलएस इन्स्टिटय़ूट कॉलेज ऑफ बीसीएमध्ये महिला व युवक सबलीकरणासाठी हनीवेल सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. भारताला भविष्यात अनेक कर्मचाऱयांची गरज भासणार असल्याने सबलीकरणाच्या माध्यमातून कौशल्य विकास करण्याचा प्रयत्न आयसीटी अकॅडमीच्यावतीने केला जाणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्मिती करून त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी हे सेंटर महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. पहिल्या टप्प्यात 100 विद्यार्थ्यांना ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी दिली जाणार असून प्लेसमेंटची व्यवस्थाही केली जाणार आहे. यासाठी तज्ञ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्रात दररोज नवनवे बदल होत असून ते कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये येण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. हनीवेल इंडियाचे अध्यक्ष आशिष गायकवाड म्हणाले, नवीन पिढीला आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देऊन त्यांच्यामध्ये रोजगार निर्मिती करण्यासाठी या सेंटरचा उपयोग होणार आहे. आतापर्यंत आयसीटी अकॅडमीने 5 हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रा. पल्लवी गुंडकल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.