प्रतिनिधी / सांगली
प्रतिवर्षी सांगली जिल्हा मराठी अध्यापक संघाच्यावतीने उपक्रमशील मराठी भाषा शिक्षकांना “गुणवंत मराठी अध्यापक पुरस्काराने” सन्मानित केले जाते. यावर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली. यामध्ये केदारी आप्पासाहेब रसाळ (रामदयाळ मालू हायस्कूल ,सांगली) व सारिका दिनेश देशमुख ( महात्मा गांधी विद्यालय कौंठुळी, तालुका- आटपाडी ) या दोघांना हे पुरस्कार २७ फेब्रुवारी रोजी “मराठी भाषा गौरव दिनी” प्रमुख पाहुणे मा. राहुल कदम सहाय्यक संचालक, स्थानिक निधी लेखा परीक्षण, सांगली यांचे हस्ते देण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष विठ्ठल मोहिते व कार्याध्यक्ष बजरंग संकपाळ यांनी दिली.
रविवार २७ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय सांगली येथे होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचे कविसंमेलन, सृजन प्रकाशनचे बालसाहित्यिक श्रीवर्धन पाटोळे, रतन संपकाळ, श्रावणी पाटील, मल्हार जाधव यांचा गौरव, वंदना हुळबत्ते यांच्या ‘चिंगीचं गणित’ या पुस्तकाचे प्रकाशन, तसेच गुणवंत मराठी अध्यापक पुरस्कार वितरण अशा विविध कार्यक्रमांनी भाषा गौरव दिन साजरा होतो आहे.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती वूमेन्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षा डॉ. लता देशपांडे ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे, डॉ. श्रीपाद जोशी,शाहीर पाटील, संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास मराठी अध्यापक व भाषाप्रेमी तसेच कविसंमेलनात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मोहिते व संकपाळ यांनी केले आहे.