प्रतिनिधी / बांदा:
स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी स्वच्छ भारत मिशन नावाचा उपक्रम भारत सरकारने २०१४ साली सुरू केला. त्यानंतर समुद्र किनारे साफ करण्याची मोहीम पण सुरू केली खर पण जनजागृती आणि लोक सहभाग याशिवाय कोणतेही उपक्रम १००% यशस्वी होणे कठीणच.
हे लक्षात घेऊ कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त दादर समुद्र किनारे साफ करण्याचे काम हाती घेण्यात आले असून शेकडो कार्यकर्ते या कार्यात आज सहभागी झाले.
गणेशोत्सव हा सण महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक सण. लोक खूप उत्साहाने आणि श्रद्धेने गेली अनेक वर्षे गणेशोत्सव साजरा करतात. पण याच श्रद्धेची जागा हळू हळू स्पर्धेत रूपांतरित होऊन माझी मूर्ती मोठी की तुझी? यावर ठेपली आणि याचमुळे मूर्तीसाठी शाडू मातीची जागा प्लास्टर ऑफ पॅरिसने घेतली. पीओपीच्या मुर्त्या वजनाने हलक्या, दिसायला सुबक आणि लागत कमी असल्यामुळे आणि अधिक फायदा मिळवण्यासाठी बऱ्याच मूर्तिकारांनी पीओपीच्या मूर्त्यांवर भर दिला. पण त्यामुळे पर्यावरणाची होणारी हानी,भक्तीपूर्ण भावनेने पूजन केलेल्या गणेश मूर्त्यांची विसर्जन केल्यानंतर समुद्र किनाऱ्यावर होणारी वाईट अवस्था याकडे उघडपणे केलेली डोळे झाक करण्यात येते.
कोकण संस्थेने जॉय ऑफ क्लिनिंग या उपक्रमांतर्गत दादरच्या समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार शनिवार दिनांक २ ऑक्टोबरला छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर येथील समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता करण्यात आली.
येथे पर्यटक यांनी केलेला कचरा, पीओपीच्या कचऱ्यात रूपांतरित झालेल्या गणरायाच्या मुर्त्या, प्लास्टिकच्या पिशव्या इत्यादी जमा करून मनपाच्या घंटा गाडीला विल्हेवाट लावण्यासाठी रस्त्यावर आणून देण्यात आले.यावेळी अक्षय ओवळे, साक्षी पोटे, प्रीती पांगे, सचिन धोपट, शशांक सावंत, प्रियांका काकडे, सुरज कदम, स्वाती नलावडे, आयेशा शेख, सिंड्रेला जोसेफ यांच्याबरोबर अनेक कार्यकर्ते, छत्रपती शिवाजी पार्क स्टेशन दादर पश्चिम आणि सहाय्यक महापालिका आयुक्त जी उत्तर विभाग यांच्या सहकार्याने उपक्रम पार पडला .
Previous Articleराऊतांना अद्याप राज्याचे मुख्यमंत्री माहिती नाहीत : राणे
Next Article सोनू नार्वेकर यांचे निधन
Related Posts
Add A Comment