पन्हाळा / प्रतिनिधी :
पन्हाळा तालुक्यातील कोडोलीचे लोकनेते, कोडोली विभाग शिक्षण संघाचे अध्यक्ष अशोकराव शंकरराव पाटील वय ६३ यांचे आज आज कोल्हापूर येथे मेंदू विकाराच्या झटक्याने उपचारादरम्यान निधन झाले.
शेकापचे जेष्ठनेते स्व. शंकरराव तुकाराम पाटील यांचे सुपूत्र असलेल्या अशोकराव पाटील यांनी वडीलांच्या कार्याचा वारसा जपत शिवसेनेच्या स्थापनेपासून आपल्या कार्याची सुरवात केली. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख म्हणून त्यानी मोठे योगदान दिले होते. तत्कालीन पन्हाळा – बावडा वैभववाडी या विधानसभा मतदार संघातून त्यानी निवडणूक लढवल्या होत्या. त्यांच्या प्रचारास शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे देखील आले होते. सेनेच्या प्रमुख नेत्यात त्यांचे नाते होते. शिवसेनेत गटबाजी सुरू झालेवर खा. नारायण राणे यांच्या बाजूने ते भक्कम उभे राहिले जिकडे राणे तिकडे मी अशी राणे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती.
अशोकराव पाटील कोडोली विभाग शिक्षण संघ, संभाजी पाणी पुरवठा संस्था, स्व. शंकर आप्पा पाटील विकास सेवा सोसायटी, दत्त तरुण मंडळ अशा माध्यमातून अखेरपर्यन्त कार्यरत राहिले, कोडोलीतील कोरे गटाचे शिलेदार म्हणून सहकारमहर्षी स्व.तात्यासाहेब कोरे,स्व. विलासराव कोरे यांचे कार्यकर्ते म्हणून त्यानी काम केले. वारणा साखर कारखान्याच्या पेपरमिल विभागाचे पर्यवेक्षक म्हणून काही वर्ष सेवा केल्यानंतर त्याच वारणा साखर कारखान्याचे ते संचालक झाले होते. अशोकराव पाटील यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले आहेत. कोडोली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.