कोयनेचा विसर्ग 50हजार क्युसेक : आयर्विनची पातळी आज 20 फुटावर जाणार
प्रतिनिधी/सांगली
कोयना वारणा धरणांसह सर्व धरणे फुल्ल भरूली असून कोयनेतून 50 हजार तर वारणेतून 8200 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी आयर्विनजवळ कृष्णेची पातळी 12.5 फुट होती. परंतू मंगळवारपर्यंत ही पातळी 20 फुटांच्या पुढे जाण्याची शक्यता असल्याचे पाटबंधारे विभागातून सांगण्यात आले. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेली अतिवृष्टी आणि धरणांतील पाण्याचा वाढता विसर्ग यामुळे नदीकाठ पुन्हा धास्तावला आहे.
सोमवारी दिवसभरात जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू असला तरी सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र मुसळधार सुरू आहे. सोमवारी दिवसभरात कोयना धरण परिसरात 37 मिमी पावसाची नोंद झाली. तर महाबळेश्वरमध्ये 70 आणि नवजामध्ये 44 मिमी पाऊस झाला. राधानगरी धरण परिसरात सोमवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत तब्बल 118 मिमी पावसाची नोंद झाली आहे. कोयनेचा विसर्ग सोमवारी मध्यरात्री 38 हजार क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला होता. मंगळवारी दुपारी त्यामध्ये सात ते आठ हजारांची वाढ करण्यात आली. तर सायंकाळी सात वाजता वक्राकार दरवाजे पाच फुट तीन इंचापर्यंत उचलण्यात आले असून विसर्ग 50 हजार क्युसेक करण्यात आला आहे.
आयर्विनच्या पातळीत दहा फुटापर्यंत वाढ शक्य
आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पाणीपातळी 12.5 फुटापर्यंत होती. परंतु सोमवारी सोडण्यात आलेला विसर्ग अद्याप सांगलीत पोहोचला नसल्याने बुधवारी सकाळपर्यंत दहाते बारा फुटाने कृष्णेची पातळी वाढल्याची शक्यता असल्याचे पाटबंधारे विभागातून सांगण्यात आले. जिल्हा प्रशासनाकडून नदीतील पाणी पातळी वाढण्याच्या पार्श्वभूमिवर नदीकाठच्या गावातील रहिवाशांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. परंतू अतिवृष्टी आणि वाढत्या विसर्गामुळे नदीकाठच्या नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
वारणा धरणात 34.35 टी.एम.सी. पाणीसाठा
दरम्यान, सांगली जिल्हयाच्या महापुरावर परिणाम करणाऱया वारणा धरणाची पाणीपातळी 34.35 टी.एम.सी.वर नियंत्रित ठेवण्यात आली आहे. 123 टी.एम.सी क्षमता असलेल्या अलमट्टी धरणात मंगळवारी रात्री 122.48 टीएमसी पाणीसाठा ठेवण्यात आला आहे. तर या धरणातील विसर्गही 53 हजार क्युसेकच्या पुढे वाढवण्यात आला आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी.
कोयना 104.49 (105.25), धोम 12.41 (13.50), कन्हेर 9.70 (10.10), दूधगंगा 24.10 (25.40), राधानगरी 8.33 (8.36), तुळशी 3.45 (3.47), कासारी 2.72 (2.77), पाटगांव 3.72 (3.72), धोम बलकवडी 4.04 (4.08), उरमोडी 8.75 (9.97), तारळी 5.54 (5.85), अलमट्टी 122.048 (123).
विविध धरणातील विसर्ग क्युसेकमध्ये
कोयना 50,000, धोम 620, कण्हेर 24, वारणा 5482, दूधगंगा 5900, राधानगरी 4256, तुळशी 507, कासारी 750, धोम बलकवडी 3596, उरमोडी 350, तारळी 3103 व अलमट्टी 53 हजार 516 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
जिह्यात रिमझिम, शिराळ्यात 22.6 मिमी पावसाची नोंद
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू असली तरी जिह्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. सर्वत्र पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. तर शिराळा तालुक्यात सर्वाधिक 22.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात जिह्यात सरासरी 4.3 मि. मी. पाऊस झाला आहे.
जिह्यात गेल्या 24 तासात पडलेला पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 1.6, जत 0.3, खानापूर विटा 2.2, वाळवा इस्लामपूर 3.9, तासगाव 0.8, शिराळा 22.6, आटपाडी 1.0, कवठेमहांकाळ 0.4, पलूस 1.8, कडेगाव 7.4.