ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाविरोधातील लढ्यासाठी मोदी सरकारने तीन टप्प्यांचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्यासाठी सर्व राज्यांना पॅकेज जारी करण्यात आले आहेत. राज्यातील आरोग्य व्यवस्था सुधारणे हा या पॅकेज मागचा उद्देश आहे.
कोरोनाविरोधात दीर्घकाळ लढाईच्या दृष्टीने मार्च 2024 पर्यंत हा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. पहिला टप्पा जानेवारी 2020 ते जून 2020, दुसरा जुलै 2020 ते मार्च 2021 आणि तिसरा टप्पा एप्रिल 2021 ते मार्च 2024 असा असेल. या पॅकेजमुळे राज्यांना अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे, औषधे खरेदी करता येतील तसेच Covid-19 च्या रुग्णांवर लक्ष ठेवण्याची क्षमता वाढवता येणार आहे. तसेच प्रयोगशाळांची संख्या वाढवणे हा Covid-19 आपातकालीन योजनेमागचा उद्देश आहे, असे केंद्राने प्रत्येक राज्याला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
पहिल्या टप्प्यात कोरोनाग्रस्तांसाठी रुग्णालयांची उभारणी, विलगीकरण कक्ष, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजनसह आयसीयू कक्ष, प्रयोगशाळा सक्षमीकरण, अतिरिक्त मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येईल. त्यासाठी राष्ट्रीय आरोग्य मोहिमेतंर्गत निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.