सरकारने उपचार अन् भरतीसंबंधी प्रसारित केले दिशानिर्देश
कोरोना महामारीमुळे मानसिक तणावाच्या वाढत्या प्रकरणांमुळे चिंतित केंद्र सरकारने दिशानिर्देश प्रसारित केले आहेत. यात संक्रमणाचा उपचार करणाऱया रुग्णालयांमध्ये मनोचिकित्सकाची व्यवस्था करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. संक्रमण रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे जीवनशैलीत आलेले बदल आणि भविष्याच्या अनिश्चिततेवरून लोकांमध्ये मानसिक तणाव वाढला आहे. लोक पूर्वीच कुठल्या न कुठल्या कारणाने मानसिक तणावाच्या स्थितीतून जाहत होते, त्यांची स्थिती आता अधिकच गंभीर झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मनोरुग्णांसंबंधी दिशानिर्देश देण्यात आले आहे. यात कोरोना संकटादरम्यान स्थापित रुग्णालयांमध्ये मानसिक आजाराच्या उपचाराची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. महामारीदरम्यान तीन प्रकारचे मानसिक विकार समोर आले आहेत. कोरोनाने बाधित 30 टक्के रुग्ण नैराश्याला तोंड देत आहेत. तर बरे झाल्यावरही 96 टक्के रुग्णांमध्ये तणावाची लक्षणे दिसून आल्याचे एका संशोधनात दिसून आले आहे.
पूर्वीपासूनच मानसिक आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांची स्थिती अधिकच बिघडली आहे. तिसऱया प्रकारच्या मानसिक आजारांच्या रुग्णांमध्ये चिंता (सौम्य ते गंभीरपर्यंत), नैराश्य, तणावाची लक्षणे, निद्रानाश, मतिभ्रम यासारखी लक्षणे दिसून आली आहेत.
कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱया रुग्णालयांमध्ये एक मनोचिकित्सक शारीरिक स्वरुपाने दूरध्वनीद्वारे सल्ल्यासाठी उपलब्ध रहावा, असे दिशानिर्देशांमध्ये म्हटले गेले आहे. कोरोनाने संक्रमित झाल्यावर कुठल्याही मनोरुग्णाची पूर्वीपासून सुरू असलेली औषधे, जर त्याच्या जीवाला धोका नसल्यास मनोचिकित्सकाच्या सल्ल्याशिवाय बंद केली जाऊ नयेत. अशा रुग्णाल नर्सिंग स्टाफच्या नजीकच बेडवर ठेवण्यात यावे, जेणेकरून त्यावर सदैव नजर ठेवता येईल. त्याच्यानजीकची खिडकीही बंद असावी आणि स्वतःला नुकसान पोहोचवू शकेल अशाप्रकारची उपकरणे आसपास नसावीत असे दिशानिर्देशांमध्ये नमूद आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये कोरोनाच्या मनौवैज्ञानिक प्रभावाचे मोठय़ा प्रमाणावर अध्ययन केले जात आहे. त्याच्या मदतीने उपाययोजना करण्यात येत आहेत.