कोरोनामुळे परकीय चलनातील 90 कोटींची उलाढाल ठप्प
विद्याधर पिंपळे / कोल्हापूर
देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये पर्यटनाला मोठे महत्व आहे. यातून मोठा रोजगार मिळत आहे. यंदा कोरोनामुळे जागतिक स्तरावरील पर्यटन क्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसला आहे. आज रविवारी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटन दिनाला याची झळ बसली आहे. कोल्हापूरातील आंतरराष्ट्रीय पर्यटन थांबले असल्याने, गेल्या सहा महिन्यामध्ये 90 कोटी रूपयाच्या परकीय चलनाची आर्थिक उलाढाल पूर्णंपणे थंडावली आहे.
कोल्हापूरातून परदेशात जाणाऱ्यांची संख्या दिवसे दिवस वाढत आहे. पर्यटनाबरोबर शिक्षण, उपचार, नातेवाईकांना भेटणे, आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स आदी कारणामुळे कोल्हापूरातील परकीय चलनाची उलाढाल वाढू लागली आहे. याच सोबत कोल्हापूर हे देश विदेशातील पर्यटकांचे आवडते डेस्टीनेशन बनले आहे. यामुळे कोल्हापूरात परदेशातील पाहुण्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील पर्यटन व्यवसायाला ब्रेक लागला आहे. याची झळ कोल्हापूरातील पर्यटन क्षेत्रालाही बसली आहे. देश विदेशातील विमान सेवा बंद असल्यामुळे आवक जावक सध्या बंद आहे. यामुळे कोल्हापूरातील पर्यटन व्यवसाय पुर्णपणे ठप्प झाला आहे. जिल्ह्या अंतर्गत पर्यटन काही ठिकाणी सुरु झाले आहे. मात्र राज्य व देश पातळीवर पर्यटनाला परवानगी नसल्याने कोल्हापूरातील उलाढाल ठप्प झाली आहे.
लॉकडाऊन पुर्वी आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी कोल्हापूरातून दर महिन्याला 15 कोटी रूपयाची परकीय चलनाची उलाढाल होत होती. यामध्ये 70 टक्के अमेरिकन डॉलर्स, 20 टक्के युरो, पाच टक्के स्टर्लिंग पौंड तर पाच टक्के इतर चलनाची उलाढालीचा समावेश आहे. मात्र 23 मार्चच्या लॉकडाउन नंतर महिन्याला होणारी 15 कोटीची परकीय चलनाची उलाढाल पूर्णपणे थंडावली आहे.
रिझर्व्ह बेँकेने परवानगी दिलेल्या कोल्हापूरातील सहा खाजगी टॅव्हल्स एजन्सी व पाच बँकांमधून परकीय चलनाची देवाण-घेवाण केली जात आहे. परकीय चलनाच्या देण्या-घेण्याचा दर वेगळा आहे. परकीय चलनाच्या देवाण-घेवाण करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने जगातील 25 चलनांना परवानगी दिली आहे. तर कांही आखाती देशामध्ये पर्यटक नसल्याने, यांचा यामध्ये समावेश नाही.
कोरोनामुळे यंदा पर्यटनाची पाटी कोरी -एन.एन. अतार, सीएमडी, रसिका ट्रव्ह्ल्स
थॉमस कूक यांनी 1810 मध्ये पर्यटनाचे रोपटे लावले आहे.आज पर्यटन क्षेत्राचा वटवृक्ष झाला आहे. देशात दरवषी 25 लाख पर्यटक आंतरराष्ट्रीयस्तरावर प्रवास करत आहेत. पण यंदा कोरोनामुळे जागतिक पर्यंटन दिन साजरा होऊ शकला नाही. लवकरच पर्यटन खुले करावे.
पर्यटनाला परवानगी द्यावी – बी.व्ही. वराडे,उपाध्यक्ष,कोल्हापूर ट्रव्हल्स,एजंट असो.
कोरोनामुळे गेले सहा महिने पर्यटन व्यवसाय बंद आहे. यामुळे कोल्हापूरातील 90 कोटी रूपयाची परकीय चलनाची उलाढाल थांबली आहे. रविवारी जागतिक पर्यटन दिन आहे. या दिनानिमित कोरोना जाऊन पर्यटनक्षेत्र पूर्ववत सुरू व्हावे.
कोल्हापूरात दरमहा होणारी परकीय चलनाची उलाढाल
चलन टक्के रूपये ( कोटी)
डॉलर 70 10.50
युरो 20 3.00
पौंड 5 .75
इतर 5 .75
लॉकडाऊनच्या काळातील व आजचा परकीय चलनाचा रूपयातील दर
20 मार्च 2020 26 सप्टेंबर 2020
डॉलर 74.80 73.61
युरो 80.65 85.63
पौंड 87.65 93.77
एप्रिल-जुलै,ऑक्टोबर-डिसेंबर पर्यटनाचा सिझन
सध्या परदेशातात शिकणाऱ्या स्थानिक विद्यार्थ्यांची फी भरण्याची प्रकिया सुरू. दर महिन्याला परकीय चलनाचे ऑडीट केले जाते. 33 देशामध्ये युरो चलनाचा वापर केला जात आहे.
आर्थिक घडी बसविण्यासाठी पर्यटनाला परवानगी द्या
देशाच्या विकासामध्ये पर्यटन क्षेत्राचा मोठा हातभार असतो. कोरोना काळामुळे सध्या सर्वच व्यवसायातील उलाढाल ठप्प झाली आहे. सध्या सरकारने जिल्हा अंतर्गत प्रवास बंदी उठवली आहे. आता राज्य अंतर्गत व देशअंतर्गत प्रवासाला परवानगी दिल्यास किमान पर्यटन क्षेत्राचे चाक यंदाच्या सिझन पुरते तरी रुळावर येईल. यातून जमा होणार कर सरकार तिजोरीत जमा होईल यामुळे पर्यटन क्षेत्राला परवानगी दिल्यास आर्थिक घडी बसविण्यास मदत होईल असा विश्वास टॅव्हलस, कंपन्यांनी व्यक्त केला.