आमदार प्रकाश आवाडेंचा आरोप
प्रतिनिधी / इचलकरंजी
मेडिकल कॉलेज सुरु झाल्याने सीपीआरची जिल्हा रुग्णालयाची मान्यता रद्द झाली आहे. त्यामुळे इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाची मान्यता मिळावी, यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र इचलकरंजीला जाणीवपूर्वक डावलून दुसरे रुग्णालय सुरु करण्याची तयारी आहे. आयजीएमला जिल्हा रुग्णालय होऊ न द्यायची भूमिका घेतली जात आहे, असा आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी येथे केला. ताराराणी पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ते बोलत होते.
आमदार आवाडे म्हणाले, कोल्हापूरसह मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागलसाठी तसेच जयसिंगपूरसाठी लसींचा साठा मोठÎा प्रमाणात उपलब्ध होतो. मात्र इचलकरंजीत मोठी लोकसंख्या असताना व देशभरातील नागरिक येथे असतानाही याबाबत अपेक्षीत सहकार्य केले जात नाही, अशी खंत आवाडे यांनी व्यक्त केली. आपला दोन कोटींचा निधी घ्या, पण पुरेसा लससाठा द्या, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.
आयजीएम रुग्णालयात लहान मुलांच्या आयसीयुसाठी 20 लाख दिले. तसेच रुग्णालय इमारत बांधकामासाठी 12 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यातून तिसरा मजला बांधण्यात येणार आहे. हे रुग्णालय 300 बेडचे करण्याची मागणी आहे. मात्र, हे रुग्णालय 250 बेडचे करण्याची मागणी मुंबईत जाऊन काहीजण करीत आहेत. कारण 300 बेडची मान्यता मिळाल्यास त्यांना आपण मेडीकल कॉलेज करण्याची भीती आहे. पण त्यांचा विरोध मोडून आयजीएम रुग्णालय 300 बेडचे करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
आयजीएम रुग्णालयातील 96 रिक्त पदे भरण्यासाठी व त्यामध्ये `त्या` 42 जणांना सामावून घेण्यासाठी आपण पाठपुरावा करीत आहे. पण दुसऱयाच मागण्या करुन मूळ विषय बाजूला ठेवला जात आहे. यातून श्रेयवाद करण्याचा प्रयत्न काहीजणांचा सुरु आहे, अशी टीका आमदार आवाडे यांनी केली.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अधिवेशनात 27 अश्वशक्तीवरील यंत्रमागासाठी 75 पैशांची अतिरिक्त सवलत देण्याचे जाहीर केले होते. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप होऊ शकली नाही. या खालील यंत्रमागासाठी एक रुपये अतिरिक्त सवलत प्रश्नी बैठक घेण्याची ग्वाही अजितदादा पवार यांनी दिली आहे. तसेच 5 टक्के व्याज अनुदानाचे अर्ज मंत्रालयात प्रलंबित असून त्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. तसेच कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कामगार कल्याण मंडळ स्थापनेबाबत घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांचे आभारी आहे. तत्कालीन कामगार मंत्री दिलीप वळसे – पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कामगार कल्याणकारी मंडळ स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी लवकर व्हावी, यासाठी उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करणार आहे, असे आमदार आवाडे यांनी सांगितले.