वार्ताहर / गोकुळ शिरगाव
कणेरी (ता. करवीर) येथे दत्त कॉलनी कणेरी येते शाळकरी मुलीला डंपरने उडवल्याने मुलगी गंभीर जखमी झाली. आज सोमवारी सकाळी आठच्या सुमारास तन्वी अशोक पाटील (वय 14) इयत्ता दहावीत शिकणारी विद्यार्थिनी या रोडवरून सकाळी शाळेत जात असताना पाठीमागून आलेल्या डंपरची तिच्या सायकलला जोरात धडक लागल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी सिद्धगिरी हॉस्पिटल कणेरी येथे ताबडतोब नेण्यात आले.
हा प्रकार घडल्यानंतर या रोडवर कणेरी गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात जमा होऊन या रस्त्यावरून होणारी डंपरची जीवघेणी वाहतूक आजपासून ताबडतोब थांबवण्याची मागणी इथल्या ग्रामस्थांनी सकाळी जोर लावून धरली. शिवाय सकाळपासून येणारे जवळपास दहा ते पंधरा डंपर यावेळी ग्रामस्थांनी अवघ्या दहा मिनिटात अडवून ठेवले.
कणेरी येथील मुख्य रस्त्यावरून गेल्या चार ते पाच महिन्यापासून मोठे (हेवी डंपर) या अरुंद रस्त्यावर 24 तास या डंपरची वाहतूक चालू आहे. या रस्त्यावरून कणेरी, कोगील खुर्द, कोगील बुद्रुक, व्हन्नूर, गिरगाव, दर्याचे वडगाव या व इतर सर्व गावातील लोक गोकुळ शिरगाव एमआयडीसीला कामाला येण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून ते साडेदहा ते अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी कामगार वर्गाची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. त्यानंतर शाळा शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची साडे दहा ते साडे अकरा पर्यंत या विद्यार्थ्यांची वर्दळ चालू असते ,शिवाय कनेरीमठ हे पर्यटन स्थळ असल्याने व महादेवाचे मोठे जागृत मंदिर असल्याने येथे येणारे पर्यटक व भाविक यांची संख्या सुद्धा या रस्त्यावरून खूप मोठ्या प्रमाणात आहे.
या रस्त्यावरून सध्या मुरूम ओढण्यासाठी येणारे मोठे (हेवी डंपर) पूर्ण रस्ता एकच डंपर व्यापत असल्याने या वाहतुकीचा धसका या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने घेतला आहे, शिवाय या डंपरने आत्तापर्यंत तीन अपघात केले आहेत. प्रत्येक वेळेला नागरिक तक्रार करतात पण याच्यावर काही उपयोग होत नाही. आज या ठिकाणी एका शाळकरी मुलीला अपघात झाल्याने आज सकाळीच या भागातील नागरिकांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी करून कोणत्याही परिस्थितीत या डंपर चालकांच्या वर आळा घालून यांची वाहतूक या रस्त्यावरून न होता त्यांना दुसरा पर्यायी मार्ग द्या अशी मागणी इथल्या पालकांनी व ग्रामस्थांनी कणेरी ग्रामपंचायत यांच्याकडे केली आहे.