प्रतिनिधी / कोल्हापूर
सार्वजनिक कार्य, उत्सव करणाऱया संस्था, मंडळे, उत्सव समित्या यांना वर्गणी परवाना सुलभरित्या मिळण्याकरिता तालुकानिहाय न्यायिक अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात असून मंडळाच्या नोंदणीलाही प्रारंभ करण्यात आला आहे. ही माहिती धर्मादाय सह-आयुक्त एस. एल. हेर्लेकर यांनी दिली.
ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया www.charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज भरण्यासंबंधीची अधिक माहिती संकेतस्थळावरील प्रणाली मार्गदर्शनमध्ये उपलब्ध आहे. अर्ज भरण्यासाठी पुढील कागदपत्रांची आवश्यकता आहे. अध्यक्ष व सचिव यांचे पॅनकार्ड तसेच ओळखपत्र. (आधारकार्ड,निवडणूक ओळखपत्र,वाहन चालक परवाना) मागील आणि या वर्षाचे हिशोब व या वर्षाचे अंदाजपत्रक (उत्सवाचा खर्च 5 हजार पेक्षा जास्त असल्यास सनदी लेखापालांकडून तयार करून घ्यावेत.) कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या परवानगरीची प्रत (मागील वर्षी परवानगी घेतली असल्यास). या वर्षापासून नव्याने कार्य, उत्सव साजरे करीत असल्यास नगरपालिका/ ग्रामपंचायत (प्रथम वर्ष उत्सव साजरा करीत असल्याबाबतचे) वरील आशयाचे शिफारसपत्र आवश्यक आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्य शासन व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वेळोवेळी जाहीर झालेल्या अटी व शर्तींचे काटेकोर पालन करण्याची हमी या प्रतिज्ञापत्राव्दारे देत आहोत असे प्रमाणपत्र क्रमांक 5 इतर कागदपत्रांमध्ये असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 41 (क) अन्वये असणारी चौकशी ही न्यायिक स्वरूपाची असल्यामुळे अर्ज योग्यरीतीने करण्याची जाबाबदारी अर्जदाराची आहे. न्यायिक चौकशीमधील स-धर्मादाय आयुक्त यांचे आदेश पारित झाल्यानंतरच परवानगी देण्यात येते. संबंधितांनी लवकरात-लवकर म.सा.वि.व्य.अधिनियम 1950 चे कलम 41 क नुसार तात्पुरत्या परवानगरीसाठी अर्ज दाखल करावेत.
गणेश मंडळांना वर्गणी परवाना देण्यासाठी करण्यात आलेले न्यायिक अधिकारी असे ः करवीर, शाहूवाडी, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा व राधानगरी तालुक्यांसाठी श्रीमती आर. आर. कोरे (सहाय्यक धर्मादाय आयुक्त-1).
शिरोळ, भुदरगड, गगनबावडा, कागल, हातकणंगले, व आजरा तालुक्यांसाठी श्रीमती व्ही.डी.भोसले (सहाय्यक धर्मादाय आयुक्त-2)