प्रतिनिधी / कोल्हापूर
शासन निर्णयानुसार इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान विषय शिकविण्यासाठी बीएससी अथवा बारावी विज्ञान शिक्षक पात्र असताना कोल्हापूर जिल्हा परिषदकडून डावलले जात होते. अखेर बुधवारी झालेल्या शिक्षण समिती सभेच्या बैठकीत विज्ञान विषय शिक्षकांना पदोन्नती देण्याचा ठराव करण्यात आला. त्यामुळे जिह्यातील सुमारे 1100 विज्ञान शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग खुला झाला असून त्यांना न्याय मिळणार आहे. शिक्षण समिती सभापती रसिका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती सभा पार पडली. यावेळी भगवान पाटील यांच्यासह सर्व समिती सदस्य व अधिकारी उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीसच 12 वी विज्ञान असणाऱया शिक्षकांच्या पदोन्नती देण्याचा विषय पुढे आला. सद्यस्थितीला 4 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रात सर्व ठिकाणी इयत्ता पाचवी पासून पुढील वर्ग सुरू झाले आहेत. पण या वर्गांवर कोल्हापूर जिह्यामध्ये गणित विज्ञान विषय शिकवण्यासाठी संबंधित संवर्गातील शिक्षकांची सुमारे 80 टक्के पदे रिक्त आहेत. या प्रश्नांसंदर्भात पदोन्नती घेण्यासाठी पात्र शिक्षकांची संख्या सुमारे 1100 आहे. पदोन्नती घेण्यास इच्छुक असणाऱयांप्रमाणेच काही विषय शिक्षक रिव्हर्शन घेण्यासही आतुर आहेत. त्यामुळे पदोन्नती झाल्यास विज्ञान विषय शिक्षकांच्या सर्व अडचणी दूर होऊन शिक्षण विभागातही विषय निहाय शिक्षकांचे मॅपिंग करण्यास सोयीस्कर होणार असल्याचे ठोस मत सदस्य भगवान पाटील व निमंत्रित सदस्य बरगे यांनी मांडला. याबाबत गेले दीड वर्ष पदोन्नतीसाठी इच्छुक शिक्षकांबरोबरच रिव्हर्शनसाठी इच्छुक शिक्षकांकडून पाठपुरावा सुरु असून त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता.
दुबार विद्यार्थ्यांचे होणार सर्व्हेक्षण करा
जिह्यात स्टुडंट पोर्टल नोंदणीत जिह्यात 6 हजार 300 विद्यार्थ्यांची दुबार नोंदणी झाली आहे. त्यामुळे दुबार नोंद झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्व्हेक्षण करून विद्यार्थी पटसंख्या निश्चित करा अशा सूचना शिक्षण सभापती रसिका पाटील यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱयांना दिल्या.
मानधन तत्वावर शिक्षक घ्यावेत
ज्या शाळांमध्ये शिक्षकांची तातडीने गरज भासत असेल त्या शाळातील शिक्षण समित्यांनी मानधन देऊन शिक्षकांची नियुक्ती करावी, असे आवाहन समिती सभेमध्ये करण्यात आले.
कमी पटसंख्येच्या शाळातील शिक्षकांची होणार बदली
ज्या शाळांमध्ये कमी पटसंख्या आहे, त्या शाळातील शिक्षकांची जास्त पटसंख्या आणि कमी शिक्षक असलेल्या शाळांमध्ये बदली करण्याचा निर्णय शिक्षण समिती सभेत घेण्यात आला.
शिंगणापूर क्रीडा प्रशालेत होणार बॅडमिंटन कोर्ट
शिंगणापूर क्रीडा प्रशालेमध्ये बॅडमिंटन कोर्ट उभारण्याबरोबरच गगनबावडा येथील परशुराम विद्यामंदीर प्रशालेचे क्रीडांगण विकसित करण्याचा निर्णय शिक्षण समिती सभेत घेण्यात आला.
तरुण भारत’ ने उठवला आवाज
याबाबत तरुण भारत'ने पदवी
कला’ शाखेची अन् शिक्षक विज्ञान'चा या मथळ्याखाली 3 एप्रिल रोजी वृत्त प्रसिद्ध करून त्याविरोधात आवाज उठवला होता. या वृत्ताची गंभीर दखल घेत सीईओ संजयसिंह चव्हाण यांनी 2014 साली ज्या कला शाखेतील पदवीधर शिक्षकांची विज्ञान विषय शिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती, अशा 370 शिक्षकांची त्यांनी पदावनतीची प्रक्रिया राबवली. यामध्ये 200 विषय शिक्षकांनी अध्यापक पदावर पदावनती मान्य केली. आता उर्वरित शिक्षकांचीही पदावनी प्रक्रिया पूर्ण करून विज्ञान शिक्षकांना पदोन्नती दिली जाणार आहे.
तरुण भारत’ने वेळोवेळी उठवलेल्या आवाजामुळे न्याय मिळाल्याची भावना विज्ञान शिक्षकांनी व्यक्त केली.