प्रतिनिधी / मडगाव
भारतात निर्मित केलेल्या कोविड-19 विरोधी लसीला अद्याप बऱयाच देशांनी मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे विदेशात नोकरीनिमित्त जाणाऱयांना दहा दिवस विलगीकरणात रहावे लागते. भाजप सरकारने भाषणबाजी करण्याच्या ऐवजी प्रभावी लस निर्माण करावी व त्याला जागतिक आरोग्य संस्थेचे मान्यता घ्यावी अशी मागणी दक्षिण गोव्याचे खा. फ्रान्सिस सार्दिन यांनी केली आहे.
मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गोव्यातून इंग्लडमध्ये नोकरीसाठी गेलेल्या युवकांना दहा दिवस विलगीकरणात ठेवण्यात आल्याने खा. सार्दिन यांनी नाराजी व्यक्त केली. जर देशात प्रभावी लस तयार केली असती आणि तिला जागतिक आरोग्य संस्थेची मान्यता मिळाली असती तर हा प्रकार घडला नसता असे ते म्हणाले.
भारतीय वैद्यानिकांसाठी शरमेची बाब
देशाअंतर्गत तयार करण्यात आलेली लस प्रभावी नसल्यानेच विदेशात जाणाऱया गोमंतकीय तसेच इतर भारतियांन विलगीकरणात रहावे लागते. या लसला जागतिक आरोग्य संस्थेची मान्यता नाही. ही भारतीय वैद्यानिकांसाठी शरमेची बाब ठरल्याचे खा. सार्दिन म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व विदेश व्यवहारमंत्र्यांनी आत्ता अधिक बोलण्याच्या ऐवजी कोविड-19 विरोधी प्रभावी लस निर्माण करावी व या लसीला विदेशात मान्यता मिळणार या दृष्टीकोनातून काम करावे असा सल्लाही त्यांनी दिला.
कोविड-19 मुळे गोव्यात अनेकांचे बळी गेले, त्यांच्य कुटूंबियांन सरकारने आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र, अद्याप बऱयाच कुटूंबाना मदत मिळालेली नाही. सरकारने या कुटूंबाना आणखीन दुःखात टाकू नये असे खा. सार्दिन म्हणाले.
सरकारच्या विविध खात्यात गेली 5 ते 10 वर्षे कंत्राटपद्धतीने काम करणाऱया कर्मचाऱयांना सरकारने अगोदर सेवेत कायम करावे, त्यांना सेवेत कायम करण्याचे सोडून सरकार नव्याने नोकरी भरती करीत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर नोकर भरती करून लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकार करीत आहे. आपण स्वता मुख्यमंत्री असताना 5 वर्षे व त्याहून अधिक काळ सरकारी सेवेत असलेल्यांना सेवेत कायम केले होते असे खा. सार्दिन म्हणाले.
सरकारने पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करावा व पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात आणावे, आज पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडल्याने सर्वत्र महागाई झालेली आहे. त्याचा फटका मध्यम वर्गीय व गरीबांना बसतो आहे. गोव्यातील सर्व रस्त्याची वाताहात झाली असून सरकार रस्ते दुरूस्त करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे दररोज अपघात होतात व निष्पाप लोकांचे बळी जातात. सरकारने रस्ते त्वरित दुरूस्त करावे. जुवारी पुलाजवळ आगशीच्या बाजूने वाहतुकीची कोंडी होत असते. वाहतूक पोलीस या ठिकाणी केवळ वाहन चालकांना ‘तालांव’ देण्याचे काम करतात, त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यावर भर द्यावा. अनेक प्रवासी हे विमानतळावर तसेच रेल्वे प्रवासासाठी जात असतात. अशा प्रवाशांची यामुळे गैरसोय होत असल्याचे त्यांनी सांगितले.
पक्ष सोडून गेले ते गेले…
लुईझिन फालेरो सारखे ज्येष्ठ नेते काँग्रेस पक्ष सोडून गेले याचे दुःख आपल्याला होत आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीत आपल्या विजयात महत्वाचे योगदान दिले होते. मात्र, आत्ता पक्ष सोडून गेले, त्यावर अधिक भर न देता काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. जे काँग्रेस पक्षासाठी कार्य करतील, त्यांना आपला सदैव पाठिंबा असेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
पाऊस पडू लागला की, बेडकांचे आगमन होते, तसेच आत्ता निवडणुकीच्या काळात अनेक राजकीय पक्ष गोव्यात येतात, ते बेडकासारखेच असतात, त्यामुळे गोवेकरांनी जागे होण्याची गरज असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले. तृणमूल काँग्रेस यापूर्वी दोन वेळा गोव्यात आली होती. त्यावेळी त्यांचे डिपोझिट जप्त झाले होते. तीच गत पुन्हा होणार होईल असे ते म्हणाले.