विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांची मागणी ः केंद्रीय आरोग्य मंत्रालय, ‘आयईसी’कडून परवानगी घेतली का हेही स्पष्ट करावे
प्रतिनिधी / मडगाव
गोव्यातील कोविड-19 रुग्णांवर आयुर्वेदिक औषधांचा उपयोग करण्यात आला तसेच आयुर्वेदिक उपचार पद्धती वापरण्यात आली असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. यासाठी नेमकी कोणती औषधे वापरण्यात आली व कोणती उपचार पद्धती वापरण्यात आली त्याची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यानी देणे गरजेचे आहे. सरकारने गोमंतकीय रुग्णांवर प्रयोग करू नयेत व त्यांचे जीवन धोक्यात घालू नये, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे.
राज्य सरकारने जो दावा केला आहे त्याप्रमाणे कोविड रुग्णांवर सदर औषधांचा वापर करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय व ‘आयईसी’कडून परवानगी घेतली होती का हे सरकारने स्पष्ट करावे. आयुष मंत्रालयाने कोविड-19 रुग्णांना आयुर्वेदिक औषधे देण्यासाठी व आयुर्वेदिक उपचार करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यता घेतली आहे का हेही उघड करावे, अशी मागणी कामत यांनी केली आहे.
सरकारने कोरोना विषाणूसंबंधी सर्व निर्णय तज्ञांना विचारून व त्यांच्या सल्ल्यानुसारच घ्यावेत या मागणीचा आपण पुनरुचार करतो. आपण सध्या कठीण व नाजूक अशा काळातून जात असून खूप विचारपूर्वक सर्व निर्णय घेणे महत्त्वाचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
सामाजिक सर्वेक्षणाचा विचार बदलावा
दरम्यान, सामाजिक सर्वेक्षण करण्यासाठी नेमलेल्या सरकारी कर्मचाऱयांच्या गुरुवारच्या प्रशिक्षण सत्राच्या वेळी ‘सोशल डिस्टन्सिंग’चे संकेत पायदळी तुडविण्यात आले. त्यासंबंधीच्या बातम्या वाचून लोकांनी या सर्वेक्षणाचा धसकाच घेतला आहे. सरकारने सुरक्षा कवच न देता कर्मचाऱयांना सर्वेक्षणासाठी पाठविल्यास गोव्यात कोरोनाचा टाईम बॉम्ब फुटण्यास वेळ लागणार नाही हे ध्यानात ठेवावे, असा इशारा कामत यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी सामाजिक सर्वेक्षणाचा विचार बदलून सामाजिक क्रिनिंग व चाचणी करण्याचा निर्णय घेणेच योग्य ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.