आता 4 ऑगस्टपासून मासेमारी हंगाम
प्रतिनिधी /पणजी
गोव्यातील मासेमारी बंदीचा दोन महिन्यांचा कालावधी 31 जुलै रोजी संपुष्टात आला असला तरी हवामान खात्याच्या इशाऱयामुळे मच्छिमारी बोटी समुद्रात उतरल्या नाहीत. आता 4 ऑगस्टपासून मासेमारी हंगाम सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.
दोन महिन्यापुर्वी म्हणजे 1 जुनपासून मासेमारी बंदी लागू झाली होती. 31 जुलै रोजी बंदी संपली की त्याच रात्री किंवा दुसऱया दिवशी 1 ऑगस्ट रोजी बहुतेक बोटी समुद्रात झेपावतात आणि मोठय़ाप्रमाणात मासळी धरून आणतात. परंतु यंदा हवामान खात्याने 3 ऑगस्टपर्यंत बोटांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा दिल्यामुळे त्या मासेमारीसाठी गेल्या नाहीत. आता 3 ऑगस्टनंतर 4 ऑगस्टपासून नवीन मासेमारी हंगाम सुरू होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
या बोटींवर काम करणारे कामगार इतर राज्यातील असून त्यांचे गोव्यात येणे सुरू झाले आहे. कर्नाटक, तामिळनाडू, ओडिशा, महाराष्ट्र येथून कामगार गोव्यात मासेमारीसाठी परतु लागल्याची माहिती बोटमालक संघटनेच्या सुत्रांनी दिली. अनेक बोटमालकांना त्यांच्या बोटीसाठी लागणारे इंधन म्हणजे डिझेल अनुदानित दराने मिळत नाही अशा तक्रारी मासेमारी खात्याकडे नोंदवल्या असून त्यांना ‘फिशिंग पास’ मिळत नाहीत असेही त्यांचे म्हणजे आहे. कुटबण जेटीवरच हे पास बोटमालकांना देण्यात येतात त्या पासवरच अनुदानित डिझेल मिळते. ते पास इतर जेटीवरील बोटमालकांना मिळावेत, अशी त्यांची मागणी आहे.