वार्ताहर/ राजापूर
वहाळत खेकडे पकडत असताना पाण्यात पडलेल्या वीजवाहिनीचा धक्का बसून पित्यासह एकुलत्या एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना राजापूर तालुक्यातील नाणार गावी घडली. दिवाकर पुजारी (42) व अथर्व पुजारी (10) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने नाणार परिसरावर शोककळा पसरली आहे.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी 7च्या सुमारास दिवाकर पुजारी आपल्या 10 वर्षाच्या मुलासह गावातील ओढय़ावर खेकडे पकडण्यासाठी गेले होते. याच ओढय़ावरून महावितरणची 11 केव्ही क्षमतेची वीजवाहिनी गेली आहे. शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱयासह झालेल्या पावसात या वाहिनीचा कंडक्टर तुटल्याने प्रवाहित वीजवाहिनी ओढय़ाच्या पाण्यात पडली होती. दुर्दैवाने पुजारी पिता-पुत्र याच ठिकाणी खेकडे पकडण्यासाठी गेले व दोघांनाही विजेचा जबर धक्का बसून त्यातच दोघांचाही मृत्यू झाला. जवळच असलेल्या काही ग्रामस्थांनी हे पाहिल्यावर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. महावितरणला कळवून वीजपुरवठा बंद करण्यात आला. मात्र तोपर्यंत या पिता-पुत्राचा प्राण गेला होता.
या घटनेची माहिती मिळताच नाणार सरपंच ओंकार प्रभुदेसाई, उल्हास प्रभुदेसाई, मजिद भाटकर, राजेंद्र पुजारी, दत्ताराम साखरकर, प्रभाकर पुजारी यांसह नाणार ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. महावितरणचे अधिकारी चिन्मय चिवडे, गवारे, ठाकरे, हिरगुडे, नाटे सागरी पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीलीप काळे हे देखील सहकाऱयांसह घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशीरा पंचनामा करण्यात आला. मृत दिवाकर पुजारी हे नाणार ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी गांधी जयंतीच्या दिवशी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयातील कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली होती. अथर्व नाणार मराठी नं.1 या शाळेत चौथीमध्ये शिकत होता. शनिवारी अत्यंत शोकाकूल वातावरणात या दोघांवरही अत्यंसस्कार करण्यात आले. मृतांच्या वारसांना महावितरणकडून आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. महावितरणचे कार्यकारी अभियंता बेले यांनी महावितरणकडून नियमाप्रमाणे मृतांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख याप्रमाणे 8 लाख रूपयांची आर्थिक मदत देण्याची ग्वाही देत तसे पत्र दिले. अंत्यसंस्कारासाठी 40 हजार रूपयांची तातडीची मदतही उपलब्ध करून दिली.