ऑनलाईन टीम / मुंबई :
कोणत्याही प्रकारच्या गुंडगिरीला घाबरू नका. कुणी गुंडगिरी करत असल्यास रात्री अपरात्री कधीही मला फोन करा. केवळ इथलेच नाहीत तर इंटरनॅशनल डॉनसुद्धा मला ओळखतात. म्हणून घाबरण्याचे काही कारण नाही, असे विधान करणारे भाजपचे गणेश नाईक यांची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
वाशी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन पार पडले यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, इंटरनॅशनल डॉनसोबत गणेश नाईक यांचे संबंध असतील आणि ते स्वतः याची कबुली देत असतील तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी करते.
तसेच देवेंद्र फडणवीस यांचा ‘पारदर्शकपणे’ हा लाडका शब्द आहे. त्यानुसार यात पारदर्शकपणे नक्की काय आहे, याचे उत्तर महाराष्ट्रातील जनतेला मिळायला हवे. म्हणजे ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ होईल, असा टोलाही खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. एप्रिलमध्ये होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात हा मुद्दा लावून धरणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
दरम्यान, सुप्रिया यांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे नवी मुंबईत राष्ट्रवादी विरुद्ध गणेश नाईक हा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.