कोकणच्या घाटमाथ्यावरील किल्ल्याकडे दुर्लक्ष : इतिहासाच्या साक्षीदाराचे संवर्धन, अभ्यास व्हावा
सौरभ मुजुमदार / कोल्हापूर
कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर राधानगरी तालुक्यातील दाजीपूरच्या अभयारण्यात कोकणच्या घाटमाथ्यावर असणारा अभेद्य, अजिंक्य किल्ला `सदानंदगड उर्फ शिवगड’ होय. करवीरचे शंभू छत्रपती यांच्या आज्ञेवरून पंत अमात्य भगवंतराव यांनी बांधलेला हा गड सध्या दुर्लक्षित आहे. एक नैसर्गिक आनंद घेण्याची टेकडी, पर्यटनस्थळ एवढेच याकडे न पाहता या इतिहासाच्या साक्षीदाराचे संवर्धन व अभ्यासाची नितांत गरज आहे.
राधानगरी वन्यजीव विभागाचे या गडाच्या अभ्यासासाठी, संरक्षण व संवर्धनासाठी विशेष प्रयत्न चालू आहेत. लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, इतिहास संशोधक, गडप्रेमी या सर्वांच्या समन्वयाने हाच शिवगड पुन्हा नव्या जोमाने शेकडो वर्षांचा जपलेला इतिहास नव्या पिढीसमोर आणण्यात यशस्वी होईल.
राज्य सरकारकडे प्रस्ताव
आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री निधीतून राधानगरी परिसरातील ऐतिहासिक वास्तू, पर्यटनस्थळे यांच्या संरक्षण, संवर्धन व नवीन योजना यासाठी महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. यामध्ये शिवगडचेही संवर्धन होणार आहे. या गडाच्या संरक्षण, संवर्धनासाठी मदत करण्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीदेखील सहमती दर्शवली आहे.
विशाल माळी, विभागीय वनअधिकारी वन्यजीव, कोल्हापूर
- किल्ल्याची पार्श्वभूमी
- इ. स. 1732 रोजी फोंडा सावंताच्या हल्ल्यातून भगवंतराव उर्फ बाजीराव अमात्य बावडा संस्थान यांनी ओलवणची टेकडी वाचविली.
- करवीरचे शंभू छत्रपती यांनी इ. स. 1732, 20 जूनच्या आज्ञापत्रात अमात्यांना बोलावून इतर मदतनीस धाडले.
किल्ला बांधणी
शंभू छत्रपतींच्या आज्ञोवरून राजश्री भगवंतराव अमात्य हुकुमत पन्हाह यांनी इ. स. 1733 साली याच ओलवणच्या टेकडीवर भक्कम किल्ला बांधला. तोच `सदानंदगड उर्फ शिवगड’ होय. असे उल्लेख सापडतात.
- ऐतिहासिक नोंदी
- यशवंतगड लढाईत केदारजी पारकर सरनोबत किल्ले शिवगडावर ठार झाल्याची नोंद
- इ. स. 1761- इ. स. 1810 सुबराव कृष्ण तत्कालीन अमात्य यांनी 21 जुलै 1786 रोजी शिवगडावर नेमणुका केल्या.
- स्वतंत्र लष्कर उभा करून रजपूत, अरब, मावळे यांचा समावेश केला.
- शिवगडावर कायमस्वरूपी धान्य, दारूगोळा ठेवण्याची व्यवस्था केली.
- शिवगड पायथ्याशी वृक्षतोड बंदी तर नवीन झाडे लावण्याची व्यवस्था.
- इ. स. 1817 रोजी नोव्हेंबर महिन्यातील शिवगडावरचा हल्ला गनिमी काव्याने मोरेश्वर सुबराव अमात्य यांनी परतवून गड अभेद्य व अजिंक्य ठेवला.
- शंभू छत्रपतींची विविध आज्ञापत्रे
- गडाच्या देखभालीसाठी मिराशी व गावकर यांना मौजे घोणसरी, साळसी यासह 4 गावचा वसूल देणेची आज्ञा.
- सौंदळ गावच्या देसाई व देशकुलकर्णींना 1000 रूपये देण्याची आज्ञा.
असेच आज्ञापत्र खारेपाटणसाठी 1000 रूपये देणेस दिले.
(वरील आज्ञापत्रांमध्ये सदानंदगड उल्लेख आहे.)
- दळणवळण नोंदी
- जनावरे, वस्तू इतर साहित्य ने-आण करण्यास शिवगडची पायवाटच सोयीस्कर व सुरक्षीत.
- इ. स. 1846 पासून या भक्कम व मजबूत शिवगडावरील वसाहती हळूहळू कमी झाल्या.