सावंतवाडी:
सावंतवाडी-आंबोली मार्गावर उपरलकर देवस्थानजवळील वळणावर गवारेडा अचानक आडवा आल्याने भाजी वाहतूक करणारा टेम्पो 20 फूट घळणीत उलटला. हा अपघात शनिवारी पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास झाला. यात टेम्पो चालक किरकोळ जखमी झाला. मात्र, टेम्पोचे सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले.
सावंतवाडीतील भाजी व्यापारी बेळगावहून भाजी खरेदी करतात. शुक्रवारी रात्री बेळगावहून भाजी घेऊन टेम्पो सावंतवाडीकडे येण्यास निघाला होता. लाडाची बाग उपरलकर देवस्थान दरम्यानच्या जंगलमय भागातील वळणावर अचानक गवारेडा आडवा आला. त्यामुळे त्याला वाचविताना टेम्पो विरुद्ध बाजूला असलेल्या 20 फूट घळणीत दोनवेळा उलटत अपघात झाला. यात चालक किरकोळ जखमी झाला. अपघातात टेम्पो व भाजीपाल्याचे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच भाजी व्यापारी उमा वारंग, राजन शृंगारे, संदीप राणे, दिलीप भावे यांच्यासह भाजी व्यापाऱयांनी धाव घेत मदतकार्य केले.