प्रतिनिधी/कोल्हापूर
‘गीत-बहार’ या विद्यार्थ्यांच्या सांगितिक बहारदार कार्यक्रमांने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाची सुरवात ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटातील ‘सूर निरागस हो…’ या गीताने झाली. सिद्धराज पाटील या दिव्यांग (अंध) विद्यार्थ्याने या गीताचे सादरीकरण केले. कुलगुरू डॉ. शिंदे यांच्यासह मान्यवरांनी गीत संपताच व्यासपीठावर जाऊन पुष्पगुच्छ देऊन त्याचे अभिनंदन केले.
‘सच्च्या गुणवत्तेला कोणत्याही मर्यादा नसतात. शारिरीक अगर अन्य कोणतेही व्यंग तुमच्या अभिव्यक्तीमधील अडथळा ठरू शकत नाही, हे सिद्धराजने खऱया अर्थाने सिद्ध केले आहे, असे कौतुकोद्गार कुलगुरू डॉ. शिंदे यांनी काढले.
अधीर मन झाले.., जीव रंगला.., मोह मोह के धागे, मला वेड लागले प्रेमाचे, नैनो में बदरा छाए, पहला नशा, डिपाडी डिपांग, एकवीरेची पाहात होते वाट, रश्के कमर अशी गीते विद्यार्थ्यांनी सादर केली. या गायक विद्यार्थ्यांत सिद्धराज पाटील याच्यासह गीता रणवाडकर, विनायक लोहार, हर्षदा परीट, भावना हांडे, रोहित कांबळे यांचा समावेश होता. त्यांना अमित साळोखे, ओंकार गुरव, विक्रम परीट, संदेश कायंदे यांनी संगीतसाथ केली. आदित्य मैंदर्गीकर यांनी निवेदन केले. या कार्यक्रमानंतर विभागाच्याच विद्यार्थ्यांनी ‘शिरियल फिरियल’ ही पार्सिकल लघुनाटिका सादर केली. तिलाही विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. संगीत व नाटय़शास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. अंजली निगवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विनोद ठाकूरदेसाई आणि निखील भगत यांनी आयोजन केले.