लवकरच जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांतधिकाऱयांना निवेदन देण्यात येणार
प्रतिनिधी/ सातारा
गोवे (ता.सातारा) येथील सजा कार्यालयातील तलाठी दोनच दिवस उपस्थित राहत असल्याने कामकाजाचा बोजवारा उडाला आहे. कार्यालयाबाहेर तलाठी कोणत्या दिवशी हजर किंवा गैरहजर आहेत, या संबंधिताचा सुचना फलक लावण्यात आला नसल्याने कार्यालय परिक्षेत्रातील ग्रामस्थांना नाहक पायपीठ व त्रास सहन करावा लागत आहे. तहसीलदारांनी सदर प्रकरणी तत्काळ लक्ष घालून पूर्ण वेळ तलाठी देवून ग्रामस्थांच्या अडचणींची सोडवणूक करण्याची मागणी तलाठी कार्यालय परिक्षेत्रातील ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
गोवे सजा कार्यालय परिक्षेत्रात साळवण, खंडोबाचीवाडी, निकमवाडी, वनगळ, दिगरगोवे, न्हाळेवाडी आदी गावांचा समावेश आहे. गोवे गावाचे सद्याची लोकसंख्या 3 हजार सहाशे पेक्षा अधिक असून तालुक्यामध्ये तलाठी कार्यालय परिक्षेत्राचा आवाका मोठा आहे. तरी सुद्धा गावास गेली दोन वर्षे पूर्णवेळ कामगार तलाठी उपलब्ध नाहीत. तलाठय़ा अभावी शैक्षणिक उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखला, चौकशी अहवाल आदी दाखल्यास विलंब होत आहे. शेतकऱयांना सात बारा, खातेउतारा व किरकोळ दाखल्यासाठी दिवस दिवस तलाठी कार्यालयात ताटकळत बसावे लागत आहे. पूर्ण वेळ तलाठी संदर्भात यापूर्वी ही अनेक वेळा मागणी करण्यात आली होती. मात्र महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे जाणवते.
या प्रश्नावर लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास वनगळ, गोवे, साळवण, खंडोबावाडी, निकमवाडी, दिगरगोवे, न्हाळेवाडी ग्रामस्थांच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.