अक्कलकोट प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील घुंगरेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील ६ विद्यार्थ्यांना खिचडी खाल्ल्याने विषबाधा झाल्याने एकच खळबळ उडाली. शनिवार दि २६ रोजी सकाळी ९ च्या दरम्यान ही खिचडी देण्यात आली होती.
सर्व विद्यार्थी शाळेच्या आवारात खिचडी खाल्ली, शाळा सुटल्यानंतर काही मुलांना मळमळ व उलटीचा त्रास सुरू झाला. मुलांचा त्रास पाहून काही पालकांनी घाबरून गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क केला. तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र करजगी येथील डॉक्टर व सेविका रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले. बाधित मुलांची तपासणी केली असता काही मुलांना शाळेतील खिचडी खाल्याने विषबाधा झाल्याचे दिसून आले. संबंधित मुलाकडे आरोग्य विभागाने विचारपूस केली असता शाळेत शिळा भात दिला होता तसेच त्याचा वास ही येत होता.
मध्यान्ह भोजन अंतर्गत दिली जाणारी खिचडी ही शाळेत शिजवली नसून कोणत्या तरी कार्यक्रमात शिल्लक राहिलेले भात दुसऱ्या दिवशी मुलांना देण्यात आले असल्याचे पालकातून बोलले जात आहे. मध्यान्ह भोजन हे शाळेतल्या स्वयंपाकगृहात न शिजवता बाहेर खाजगी ठिकाणी शिजवून आणले जाते असे ही बोलले जात आहे. शाळा भरू लागल्याने विद्यार्थ्यांसाठी कोरडे धान्य देणे बंद करत आता शाळेतच खिचडी शिजवून देण्याच्या कामाला सुरुवात झाले आहे. मात्र घुंगरेगाव येथे शाळेत शिजवून न देता कार्यक्रमातून राहिलेले शिल्लक भात दुसऱ्या दिवशी मुलांना देऊन विषबाधा होण्यास शाळेचे मुख्याध्यापक व संबंधित कर्मचारी जबाबदार आहेत असा संताप पालक वर्गातून होत आहे.