चिपळूण
बहाद्दूरशेखनाका येथील ‘हिरापन्ना मिठाईवाला’ या दुकानाला शॉटसर्किटमुळे बुधवारी सकाळी 10.30 च्या सुमारास आग लागल्याने एकच खळबळ उडाली. या दीड तासाच्या प्रयत्नानंतर नगर परिषदेच्या अग्निशमन बंबामुळे आग आटोक्यात आली. महामार्गालगत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात वाहतूककेंडी झाली होती.
मुंबई-गोवा महामार्गावरील बहाद्दूरशेख नाका येथील सहकार भवन इमारतीत तळमजल्यावर हिरापन्ना मिठाईवाला हे स्वीटमार्ट आहे. बुधवारी सकाळी 10.30 च्या सुमारास स्वीटमार्टच्या मुख्य खरेदी-विक्री दालनावरील भटारखान्यास अचानक आग लागल्याने कामगारांची धावपळ उडाली. आग विझविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. काही वेळातच चिपळूण नगर परिषदेचा अग्निशमन बंब दोन पाण्याच्या टँकरसह घटनास्थळी दाखल झाला. या बंबाद्वारे आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र आग वाढत गेली. पाहता पाहता या आगीने रौद्ररुप धारण केल्याने धुराचे लोळ परिसरात पसरले आणि एकच खळबळ उडाली.
भटारखान्यात चार गॅस सिलिंडर होते. सर्वप्रथम हे सिलिंडर बाहेर काढण्यात आले. हे सिलिंडर तेथेच राहिले असते तर आरखी मोठी दुर्घटना घडली असती. मुख्य चौकातच ही घटना घडल्याने अनेकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्यात सहभाग घेतला. घटनास्थळी बघ्यांचीही गर्दी जमल्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलीस यंत्रणेच्या उपाययोजनांमुळे ही कोंडी कमी झाली.
आगीवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱयांकडून विशेष प्रयत्न केले. दीड तासाच्या अथक परिश्रमानंतरआग आटोक्यात येईपर्यंत भटारखान्यातील बेकरीसाहित्य जळून खाक झाले होते. यावेळी लोटे येथील औद्योगिक विकास महामंडळाचा अग्निशामन बंबदेखील घटनास्थळी दाखल झाला होता.
कर्मचाऱयांनी टाकल्या भटारखान्यातून उडय़ा
भटारखान्यात आगीने पेट घेतल्यानंतर प्रथम तेथील कामगारांकडून ही आग विझविण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र आग अधिकच भडकल्याने कामगारांनी आपला जीव वाचवण्यासाठी भटारखान्याच्या खिडक्याची लोखंडी जाळी तोडून 20 ते 22 फुटावरुन उडय़ा घेतल्या. यामुळेच त्याचा प्राण वाचला. ही आग शॉटसर्किटमुळेच लागल्याची माहिती हिरापन्ना मिठाईवाला स्वीटमार्टचे संचालक गणेश चौधरी यांनी दिली आहे.
महसूल यंत्रणेकडून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, पंचायत समिती सभापती धनश्री शिंदे, नगरसेवक परिमल भोसले, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, युवा नेते फैसल पिलपिले, आरपीआय कार्यकर्ते राजू जाधव, सुभाष जाधव, आप्पा कदम, नित्यानंद भागवत आदींनी घटनास्थळाला भेट दिली..
चिपळूण न.प.च्या अग्निशमन यंत्रणेचा बोजवारा
अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या अभावामुळे चिपळूण नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेचा पुरता बोजवारा उडाला आहे. बहाद्दूरशेख नाका परिसरात बुधवारी स्वीटमार्टला लागलेल्या आगीतून ही गोष्ट पुन्हा एकदा समोर आली आहे. 2008 मध्ये या बाबत नगर परिषदेकडे लेखी पत्रव्यवहार करूनही प्रशासनाने लक्ष न दिल्याने त्या विरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा, शिवसेना माजी विभागप्रमुख नित्यानंद भागवत यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनात म्हटले की, नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेबाबत आपण परिषद प्रशासनास 3 मार्च 2008 पासून पत्रव्यवहार करत आहे. नगर परिषदेत महाराष्ट्र शासनाच्या मंजूर आकृतीबंधानुसार मंजूर कर्मचाऱयांपैकी अनेक पदे रिक्त आहेत. तसेच नगर परिषदेकडे पाण्याच्या अग्निशमन बरोबरच मेकॅनिकल फोम सिलिंडर, कार्बन डायऑक्साईड सिलिंडरसारखी अग्निशमके तसेच फायरमन सुरक्षिततेसाठी ऍप्रन, सेफ्टी शूज, हेल्मेट, सेफ्टी ग्लोव्हज, ऍसबेसस्टॉस ग्लोव्हज, सेफ्टी गॉगल या साधनांची गरज आहे. आपल्या कडील कर्मचाऱयांना फायर फायटिंग व प्रथमोपचारकाचे प्रशिक्षण दिलेले नाही. या विषयात गांभीर्याने लक्ष घातलेले नाही, हे बुधवारी झालेल्या बहाद्दुरशेख नाक्यावरील हिरापन्ना स्वीट मार्टला लागलेल्या घटनेतंर स्पष्ट झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी आलेल्या अग्निशामन बंबावर काम करणाऱया कर्मचाऱयांनी कोणत्याही प्रकारची सुरक्षिततेची साधने वापरली नव्हती. त्यामुळे अशा यंत्रणेमुळे भविष्यातील दुर्घटना टळावी, यासाठी, 1 मे रोजी रोजी सकाळी 9.30 वा. नगर परिषदेच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी युवासेना शहरप्रमुख निहार कोवळे, नगरसेविका रश्मीताई गोखले, ओंकार नलावडे उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री ऍड.अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे आदांना पाठवण्यात आल्या आहेत.