परिसरात संकट उद्भवण्याचा फ्रान्सचा इशारा
पॅरीस / वृत्तसंस्था
कोरोनाच्या प्रसारानंतर आता चीनच्या अणुभट्टीतील गळती जगासमोर संकट निर्माण करणार, असे चिन्ह आहे. या अणुऊर्जा प्रकल्पातून गेला एक आठवडाभर उत्सर्जक आणि धोकादायक पदार्थांची गळती होत आहे. या संबंधीची वृत्ते चीनने लपविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. अमेरिकेने ही माहिती उघड केली असून या गळतीमुळे आसपासच्या परिसरात मोठे संकट उद्भवू शकते, असा इशारा फ्रान्सने दिला आहे. ही गळती लवकर नियंत्रणात न आणल्यास आजूबाजूचे देशही प्रभावित होऊ शकतात, असा इशारा काही तज्ञांनी दिला आहे.
चीनच्या गोंगडाँग प्रांतातील तैशान येथे ही अणुभट्टी आहे. या भट्टीच्या व्यवस्थापनाकडून गेला आठवडाभर गळतीचा इशारा देण्यात येत आहे. या गळतीमुळे या भट्टीच्या परिसरातील उत्सर्जन प्रमाणात स्वीकारार्ह मर्यादेपेक्षा बऱयाच अधिक प्रमाणात वाढ झाली आहे. या अणुभट्टीच्या सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी निर्माण झाल्याने ही गळती सुरू झाली. प्रथमतः या गळतीचा धोका भट्टीत काम करणाऱया कामगारांना होत आहे. तसेच आसपासच्या परिसरात वास्तव्यास असणाऱया लोकांचेही जीव आणि प्रकृती धोक्यात आहे. या गळतीवर लवकर नियंत्रण आणणे आवश्यक आहे, असा इशारा फ्रान्सच्या सरकारने दिला आहे.
अमेरिकेकडून मोजणी सुरू
चीनी अणुभट्टीच्या गळतीचे शास्त्रीय मूल्यांकन अमेरिकेकडून सुरू आहे. या अणुगळतीची तीव्रता किती आहे, गळतीपासून किती प्रमाणात धोका संभवतो, हा धोका भट्टीच्या परिसरापुरता मर्यादित आहे की तो सर्वदूर पसरू शकतो, ही गळती थांबविण्यासाठी किती व कसे प्रयत्न करावे लागतील इत्यादी सर्व बाजूंनी अमेरिकेचा अभ्यास सुरू असून लवकरच अहवाल प्रसिद्ध होणार आहे.
चीनशी संपर्क
गळतीसंदर्भात चीनी प्रशासनाशी संपर्क केला जात आहे. त्यांच्याकडून सहकार्याची आणि पारदर्शित्वाची अपेक्षा आहे. ही गळती अद्याप आणीबाणीच्या स्थितीपर्यंत पोहचलेली नाही असा अमेरिकेचा कयास आहे. मात्र, त्यासंबंधी सविस्तर चौकशी केल्यानंतरच निश्चितपणे सांगता येईल, असे प्रतिपादन अमेरिकेच्या अधिकाऱयांनी केले. मात्र फ्रान्सने आताच धोक्याचा इशारा दिला असून ही गळती तीव्र असल्याचे स्पष्ट केले. चीनच्या सीमा ओलांडून या गळतीचा धोका पोहचेल का, यावर तज्ञांमध्ये दुमत असल्याचे दिसून येते. फ्रान्सच्या फ्रामाटोम या कंपनीने ही गळती धोकादायक असल्याचे स्पष्ट केले.
बैठकांचे सत्र
गळतीचे वृत्त येताच अमेरिकेत बैठकांचे सत्र सुरू झाले. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा मंडळाने किमान तीन बैठका गेल्या तीन दिवसांमध्ये घेतला. तेथील वृत्तपत्रांमध्येही मोठय़ा प्रमाणात या गळतीला प्रसिद्धी दिली गेली. चीनने अद्याप या गळतीची माहिती अधिकृतरित्या प्रसिद्ध केलेली नाही. मात्र अमेरिका व फ्रान्सच्या उपग्रहीय व्यवस्थेने, तसेच सेन्सर्सच्या माध्यमातून गळतीची पुष्टी केली.
आतापर्यंत जीवीत हानी नाही
आतापर्यंत या गळतीमुळे जीवीत हानी झाल्याचे अधिकृत वृत्त नाही. तसेच चीनने गळती रोखण्यासाठी पेलेल्या उपायांचीही माहिती देण्यात आलेली नाही. या गोपनीयतेमुळे संशय अधिकच बळावला आहे. चीनने पारदर्शीपणा दाखवून गळतीची माहिती द्यावी अशी अपेक्षा जगातून व्यक्त होत आहे.
भट्टी बंद करावी लागणार ?
ही भट्टी फ्रान्सच्या फ्रामाटोन या कंपनीने तयार केली होती. तथापि. तिचे व्यवस्थापन पूर्णतः चीनच्या प्रशासनाचे आहे. फ्रामाटोन कंपनीने गळती सुरू झाल्यानंतर अमेरिकेकडे तांत्रिक सहाय्याची विनंती केली. तथापि, चीन सरकारने सारेकाही अलबेल असल्याचा आव आणला. परिणामी, फ्रान्स याकामी चीनच्या सहकार्याशिवाय साहाय्य करू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. ही भट्टी पूर्णतः बंद करावी लागणार असे काही तज्ञांचे मत आहे, रशियातील चेर्नोबिल किंवा जपानमधील फुकुशिमा येथे पूर्वी असे अण्विक अपघात झाले आहेत व त्या भट्टय़ा बंद कराव्या लागल्या आहेत, ही बाब अधोरेखित केली जात आहे.